मराठा आरक्षणासाठी सांगली ते मुंबई वारी निघणार; सायकल रॅलीचेही नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 03:50 PM2024-01-16T15:50:50+5:302024-01-16T15:51:58+5:30

सांगली : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हाभर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. जरांगे-पाटील ...

Sangli to Mumbai for Maratha reservation; A cycle rally is also planned | मराठा आरक्षणासाठी सांगली ते मुंबई वारी निघणार; सायकल रॅलीचेही नियोजन

मराठा आरक्षणासाठी सांगली ते मुंबई वारी निघणार; सायकल रॅलीचेही नियोजन

सांगली : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हाभर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. जरांगे-पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे पायी चालत ते मुंबईत पाेहोचणार आहेत. याच आंदोलनात सहभागी होण्यासाठी सांगलीतूनही आरक्षणाची वारी काढून मराठा बांधव मुंबईतील आंदोलनात सहभागी होतील, असा निर्णय घेण्यात आला. सांगलीत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली.

जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार पाठपुरावा करूनही राज्य सरकारचे त्याकडे लक्ष जात नाही. यामुळे आता २६ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी ते २० जानेवारीपासून पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. ही पदयात्रा २६ जानेवारीला मुंबईत पोहोचणार आहे.

यात सहभागी होण्यासाठी सांगलीतील बांधवही चालत जाणार आहेत. ते जरांगे-पाटील यांच्यासोबत पुण्यापासून मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पदयात्रेला आरक्षण वारी असे नाव देण्यात आले आहे. त्यात गावागावांतील मराठा बांधव सहभागी होणार आहेत. २२ जानेवारीला सांगलीतून या वारीला सुरुवात होणार आहे.

आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. २० जानेवारीला सांगलीतून सकाळी ही रॅली मुंबईच्या दिशेने रवाना होईल. ज्या बांधवांना सायकल रॅलीत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अशोक पाटील कोकळेकर, युवराज शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने आणि ज्यांना शक्य आहे, त्यांनी वारीमध्ये चालत सहभागी होऊन आरक्षणाच्या लढ्याचा भाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. संजय पाटील, प्रशांत भोसले, ऋषिकेश पाटील, युवराज शिंदे, अशोक पाटील, शंभोराज काटकर यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.

गुरुवारी बैठकीचे आयोजन

आंदोलनाची पुढील दिशा ठरवत जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने मराठा बांधव या लढ्यात सहभागी व्हावेत यासाठी गाव पातळीवर प्रबोधन करण्यात येणार आहे. ‘आरक्षण वारी’चे नियोजन करण्यासाठी गुरुवार, दि. १८ रोजी सांगलीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Sangli to Mumbai for Maratha reservation; A cycle rally is also planned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.