सांगलीत आज बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार

By admin | Published: January 19, 2017 12:25 AM2017-01-19T00:25:03+5:302017-01-19T00:25:03+5:30

तयारी पूर्ण : पंधरा लाखांच्या सहभागाचा आयोजकांचा दावा; १२० संघटनांचा पाठिंबा

Sangli Today Elgar of Bahujan Kranti Morcha | सांगलीत आज बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार

सांगलीत आज बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार

Next



सांगली : अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करा, यासह ३८ मागण्यांसाठी दि. १९ रोजी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी १० वाजता काँग्रेस भवन येथून मोर्चास सुरुवात होणार आहे, तर पुष्पराज चौकात जाहीर सभेने मोर्चाची सांगता होणार आहे. पंधरा लाख समाजबांधव या मोर्चात सहभागी होतील, असा दावा संयोजकांनी केला आहे.
सांगलीत मोर्चाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी जयसिंग शेंडगे, प्रा. नामदेवराव करगणे, अरूण खरमाटे, सुरेश चिखले, प्रल्हाद मलमे, सुनील होवाळे, अशोक गोसावी, फारूख संगतरास, शशिकांत गायकवाड, संदीप कांबळे, भास्कर खोत, जमीर जमादार, रमेश कोरडे, मुनीर आब्बास पट्टेकरी, प्रवीण तेली यांची संयुक्त पत्रकार परिषद बुधवारी झाली. यावेळी ते म्हणाले की, मोर्चामध्ये सर्व जाती, धर्मातील लोक, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटना, खासगी संस्थांतील कर्मचारी संघटना, रिक्षा संघटनेसह जिल्ह्यातील १२० संघटना व पक्षांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे, अशी माहिती देण्यात आली.
बहुजन समाजाच्या अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी, शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. अनेक समाज लोकसंख्येने छोटे असल्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. म्हणूनच सर्व बहुजन समाज एकत्र आला आहे.
त्यांच्या अ‍ॅट्रॉसिटी कायदा, धनगर, रामोशी, कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, मराठा, मुस्लिम समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण मिळाले पाहिजे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, महामंडळाला निधी, लिंगायत व जैन धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा, महापुरूषांच्या जयंतीला शासकीय सुटी देण्यात यावी, यासह ३८ मागण्यांसाठी हा बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पंधरा लाखांहून अधिक समाजबांधव सहभागी होणार आहेत.
आंदोलनकर्त्यांपैकी काही लोक सकाळी ९.१५ वाजता सांगलीतील शिवाजी मंडई येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि बसस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी जातील. त्यानंतर महिलांचे शिष्टमंडळ सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर मोर्चाची सुरुवात काँग्रेस भवन येथून सकाळी दहा वाजता होणार आहे. पुष्पराज चौक येथे जाहीर सभा होणार आहे.
येथे आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ-बोर्डाचे कार्यकारी सदस्य मौलाना सज्जाद नौमानी, विश्व लिंगायत महासभेचे कार्यकारी अध्यक्ष कोर्णेश्वर महास्वामी, वामन मेश्राम, जयसिंग शेंडगे आदी मार्गदर्शन करणार आहेत. (प्रतिनिधी)
जय्यत तयारी : चार हजार वाहनांची व्यवस्था
मोर्चामध्ये जिल्ह्यातील बहुजन समाजाला सहभागी होता यावे, यासाठी एक हजार ट्रक, तसेच तीन हजार चारचाकी वाहनांची व्यवस्था केली आहे. तसेच या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे. पार्किंग व्यवस्थेसह आंदोलकांच्या मदतीसाठी पाच हजार स्वयंसेवक काम करणार आहेत. प्रमुख नेते आणि आंदोलकांपर्यंत आंदोलनाच्या धोरणाविषयीची माहिती पोहोचविण्यासाठी पुष्पराज चौक ते विश्रामबाग, राम मंदिर चौक, स्टेशन चौक, कॉलेज कॉर्नर रस्ता, आंबेडकर रस्ता याठिकाणी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती संयोजक सुनील होवाळे यांनी दिली.

आज सलून दुकाने बंद
सांगलीत आज दि. १९ रोजी बहुजन क्रांती मोर्चा निघणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सलून दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. सांगलीतील सेना मंदिर येथे नाभिक बांधव एकत्र जमून मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश चिखले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: Sangli Today Elgar of Bahujan Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.