सांगली : नियतीचा आघात, तरीही दुष्काळाशी दोन हात..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 04:00 PM2018-05-22T16:00:52+5:302018-05-22T16:00:52+5:30
नियतीच्या आघाताने अपंगत्वाशी संघर्ष करणाऱ्या बस्तवडे (ता. तासगाव) येथील तीसभर दिव्यांगांनी अपंगत्वावरही मात केली. पानी फौंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली. पंचेचाळीस दिवसांत मोठ्या जिद्दीने श्रमदान करून तब्बल आठ माती नालाबांध तयार केले. अपंगत्वावर मात करून धडधाकट माणसाला लाजवेल, असे काम केले.
दत्ता पाटील
तासगाव : नियतीच्या आघाताने अपंगत्वाशी संघर्ष करणाऱ्या बस्तवडे (ता. तासगाव) येथील तीसभर दिव्यांगांनी अपंगत्वावरही मात केली. पानी फौंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली. पंचेचाळीस दिवसांत मोठ्या जिद्दीने श्रमदान करून तब्बल आठ माती नालाबांध तयार केले. अपंगत्वावर मात करून धडधाकट माणसाला लाजवेल, असे काम केले.
अपंग माणूस धडधाकट माणसासारखे काम करू शकत नाही, हा समज तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील दिव्यांगांनी खोडून काढला आहे. काही महिन्यांपूर्वी गावातीलच कविता सिद्राम पाटील यांनी गावातील दिव्यांगांचा शोध घेत संघर्ष दिव्यांग संघटनेची स्थापना केली.
कोण पायाने अपंग, कोणाला पूर्णपणे अंधत्व, कोण कर्णबधिर, कोण गतिमंद, अशा एक ना अनेक दिव्यांगांना एकत्रित करत कविता पाटील यांनी संघटना स्थापन केली. दिव्यांग म्हणून किमान स्वत:चे हक्क मिळवता यावेत, एवढ्याच माफक अपेक्षेने या संघटनेची स्थापना झाली.
प्रत्येक सभासदाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. नेमके याच काळात दीड महिन्यांपूर्वी गावात वॉटरकप स्पर्धेअंतर्गत पानी फौंडेशनचे काम सुरु झाले. या संघटनेतील प्रत्येक सदस्य अपंगत्वापेक्षाही घरच्या परस्थितीनेच जास्त पिचलेला.
दुष्काळाच्या झळा यांनाही सोसाव्या लागलेल्या. त्यामुळे या सर्व दिव्यांगांनी पहिल्याचदिवशी दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार केला. ८ एप्रिलला मध्यरात्री १२ वाजताच कामाचा श्रीगणेशा केला. त्यादिवसापासून एकही दिवस न चुकता, न थकता कामात सातत्य ठेवले. दीड महिन्यात तब्बल आठ माती नालाबांध तयार केले.
आधार कोण देणार?
तहसीलदार सुधाकर भोसले यांनी संघटनेतील बहुतांश दिव्यांगांना पेन्शन मंजूर करून दिली. त्यामुळे सहाशे रुपयांचा आधार कुटुंबाच्या खर्चासाठी झाला.
दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम करत मिरज येथील लेप्रसी हॉस्पिटलने गावातील दिव्यांग आणि त्यांच्या नातेवाईकांना शिलाई प्रशिक्षण देऊन रोजगाराची दिशा दिली. मात्र प्रशिक्षण घेतले तरी शिलाई मशीन खरेदीसाठी पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न या दिव्यांगांना पडला आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर, सामाजिक संघटनांकडून पुढाकार घेण्याची गरज आहे.
जिद्दीला पाठबळाची अपेक्षा
बस्तवडेतील दिव्यांगांनी एकत्रित जिद्दीची कहाणी प्रत्यक्षात समाजासमोर आणली. नि:स्वार्थी वृत्तीने केलेले हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र या संघटनेतील बहुतांश सदस्यांच्या मनात वाहणारी वेदना निराळीच आहे. बहुतांश अपंगांना शासनाकडून तुटपुंजे मानधन मिळू लागले आहे. मात्र त्याव्यतिरिक्त शासनाकडून कोणतीच मदत मिळालेली नाही. दिव्यांगांच्या जिद्दीला पाठबळाची अपेक्षा आहे.