सांगली : दंडोबा डोंगर येथे रविवारी वृक्षारोपण , 29 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:56 PM2018-06-29T17:56:10+5:302018-06-29T17:59:53+5:30
राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्हा सज्ज असून, रविवार, दि. 1 जुलै रोजी दंडोबा डोंगर, भोसे येथे सकाळी 9 वाजता सांगली जिल्ह्याचा मुख्य वृक्षलागवड कार्यक्रम होणार आहे.
सांगली : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्हा सज्ज असून, रविवार, दि. 1 जुलै रोजी दंडोबा डोंगर, भोसे येथे सकाळी 9 वाजता सांगली जिल्ह्याचा मुख्य वृक्षलागवड कार्यक्रम होणार आहे.
यावेळी लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय यंत्रणाप्रमुख उपस्थित राहून वृक्षलागवड करणार आहेत. वृक्षारोपणाच्या या सामाजिक कार्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, प्राणीमित्र संघटना, निसर्ग प्रेमी, शासकीय, निमशासकीय संस्था, विविध शाळा, विद्यालये यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे.
या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्हा सज्ज आहे. सन 2018 च्या पावसाळ्यात सांगली जिल्ह्यात वन विभागासाठी 11 लाख 50 हजार, सामाजिक वनीकरण विभागासाठी 5 लाख, ग्रामपंचायतींसाठी 7 लाख 63 हजार व इतर यंत्रणांसाठी 5 लाख 4 हजार असे एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता वन विभागासह, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत व इतर यंत्रणा यांच्याकडून नियोजन केले असून वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी खड्डे खुदाई पूर्ण झाली आहे. वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या 43 रोपवाटिकेमध्ये 45 लाख रोपे उपलब्ध आहेत.
यापैकी 29 लाख 17 हजार रोपांची या वर्षी लागवड करण्यात येणार आहेत. उर्वरित रोपे पुढील वर्षीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी वापरण्यात येणार आहेत. संबंधित यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर रोपलागवड साईट निश्चित केल्या असून आजमितीस 29 लाख 46 हजार रोपलागवड स्थळांची नोंद ऑनलाईन संकेतस्थळावर करण्यात आली आहे. 29 लाख 17 हजार रोपलागवडीच्या अनुषंगाने 29 लाख 35 हजार खड्डे खुदाई करण्यात आली आहे.
या कार्यक्रमामध्ये सर्वांना मोठ्या प्रमाणात सहभागी होता यावे, यासाठी www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र हरित सेना सदस्य नोंदणी सुरू आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातून 1 लाख 60 हजारहून अधिक सदस्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, निसर्गप्रेमी, प्राणीमित्र संघटना, आध्यात्मिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांनाही या कार्यक्रमात योगदान देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.