सांगलीत ट्रक टर्मिनस होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:52 PM2017-08-27T23:52:12+5:302017-08-27T23:52:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील मोठ्या व्यापारी पेठा, मार्केट यार्डात होणारी उलाढाल यामुळे सांगली शहरात मोठ्या संख्येने अवजड वाहने दाखल होत आहेत. त्यांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न शहराला भेडसावत आहे. त्यामुळे सुमारे ५८ कोटी रुपये खर्चाचा अद्ययावत ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला आहे, अशी माहिती आ. सुधीर गाडगीळ यांनी दिली.
ते म्हणाले की, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात अनेक व्यापारी पेठा व मार्केट यार्ड आहे. याठिकाणी दररोज शेकडो अवजड वाहने दाखल होत असतात. एकाचवेळी या अनेक अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी सध्या शहरात जागाच उपलब्ध नाही. सध्याच्या वाहनतळात पुरेशा सुविधा नसल्याने तसेच अविकसित भाग असल्याने सर्व वाहने शहरामधील रहिवासी क्षेत्रातील रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे पार्क केली जातात. प्रतिदिनी जवळपास ५०० ते ६०० ट्रक अशाप्रकारे रस्त्याकडेला लावले जातात. त्यामुळे या रहिवासी वस्तीमधील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
अस्ताव्यस्त पार्किंगमुळे शहरामधील सर्व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सध्या वापरात असलेल्या वाहन तळाच्या जागेवर अद्ययावत पद्धतीने सर्व सुविधांनी सुसज्ज वाहन तळ (ट्रक टर्मिनस) विकसित करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने याकामी नियुक्त केलेल्या वास्तुविशारदांनी प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामध्ये ट्रक टर्मिनस जागेचा विकास करण्याकरिता अंदाजपत्रकानुसार अपेक्षित खर्च रुपये १२ कोटी ६१ लाख ९३ हजार २७0 इतका गृहित धरला आहे. तसेच ट्रक टर्मिनस जागेमध्ये विकसित करावयाच्या इमारत बांधकामाचा अंदाजपत्रकानुसार अपेक्षित खर्च रुपये ४४ कोटी ६३ लाख ५२ हजार ७२१ रुपये गृहित धरला आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत अत्यल्प असल्याने केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. हे ट्रक टर्मिनस झाल्यास सांगली शहरास भेडसावणारी मोठी समस्या दूर होईल. तसेच येथील नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.
या ठिकाणी येणाºया वाहनधारकांना सर्व सोयी-सुविधा मिळाल्यामुळे त्यांचाही त्रास कमी होईल व शहरावरील वाहतुकीचा ताण नाहीसा होईल. त्यामुळेच नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतची कल्पना दिली. त्यांनीही यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी आ. सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, प्रशांत शहा, पांडुरंग कोरे उपस्थित होते.
५८ कोटी खर्च
ट्रक टर्मिनस उभारण्यासाठी सुमारे ५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध व्हावा यासाठी निवेदन दिले आहे. गडकरी यांनी तातडीने याची दखल घेत ट्रक टर्मिनससाठी लवकर प्रस्ताव मागवून घेण्यासाठी संबंधित अधिकाºयांना आदेश दिले.