सांगली : तासगावात दोन लाखाचे दागिने लंपास, बस स्थानकातील प्रकार, गर्दीत विट्यातील महिलेस लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:58 PM2017-12-30T14:58:07+5:302017-12-30T14:58:55+5:30
सांगलीहून विट्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना खुर्शदबी अब्दुलअजीज मुल्ला (वय ६३, रा. मुल्ला गल्ली, विटा) या महिलेचे ७० ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ८९ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तासगाव बस स्थानकात घडली. याप्रकरणी मुल्ला यांनी शुक्रवारी दुपारी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
विटा : सांगलीहून विट्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना खुर्शदबी अब्दुलअजीज मुल्ला (वय ६३, रा. मुल्ला गल्ली, विटा) या महिलेचे ७० ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ८९ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तासगाव बस स्थानकात घडली. याप्रकरणी मुल्ला यांनी शुक्रवारी दुपारी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
विटा येथील खुर्शदबी व त्यांचे पती अब्दुलअजीज मुल्ला हे गुरूवारी नातेवाईकाच्या विवाहासाठी तासगाव तालुक्यातील तुरची-ढवळी येथे गेले होते. गुरूवारी विवाह समारंभ संपल्यानंतर ते पलूस बसने तासगाव बस स्थानकात गेले. त्यावेळी सायंकाळी सांगली-विटा ही बस फलाटावर आल्यानंतर विट्याकडे येण्यासाठी ते बसमध्ये चढत होते. त्यावेळी बसच्या दरवाजात अन्य महिलांनी मोठी गर्दी केली.
या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मुल्ला यांच्या पर्समधील ८१ हजार रूपये किमतीचे तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ८१ हजार रूपये किमतीची तीस ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ व २२ हजार रूपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ असे एकूण १ लाख ८९ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांचा सल्ला...
विटा येथे आल्यानंतर मुल्ला यांच्या लक्षात चोरीचा हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी त्यांनी गुरूवारी रात्री विटा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. परंतु, पोलिसांनी त्यांना शुक्रवारी सकाळी फिर्याद देण्यास येण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सौ. मुल्ला यांनी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता अज्ञात चोरट्यांविरूध्द फिर्याद दिली.