सांगलीत मद्यधुंद चालकाची 10 वाहनांना धडक, दोन जण थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:54 PM2018-09-28T12:54:59+5:302018-09-28T13:33:29+5:30
दहिवडी (जि. सातारा) येथील संजय नागू राऊत (वय ३५) या मद्यधुंद चालकाने स्वत:च्या ताब्यातील ट्रक हयगयीने व अविचाराने चालवून कॉलेज कॉर्नर ते गावभागात गुरुवारी मध्यरात्री थरार माजविला.
सांगली : दहिवडी येथील संजय नागू राऊत (वय ३५) या मद्यधुंद चालकाने भरधाव ट्रक चालवत कॉलेज कॉर्नर ते गावभागात गुरुवारी मध्यरात्री थरार माजवला. रस्त्यावरील दहा वाहनांना त्याने धडक दिली. कॉलेज कॉर्नरवर रस्त्यावर बोलत उभा राहिलेल्या दोघांच्या अंगावर ट्रक घातला. मात्र ते थोडक्यात बचावले. नागरिकांनी पाठलाग करुन चालक राऊत यास पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
संजय राऊत गुरुवारी मार्केट यार्डात ट्रकने (क्र. एमएच ११ एएल ००४५) माल घेऊन आला होता. माल उतरल्यानंतर त्याने मद्यप्राशन केले. त्याला चालताही येत नव्हते. तरीही तो ट्रक चालविण्यास बसला. टिंबर एरियातून कॉलेज कॉर्नरमार्गे तो शहरात घुसला. कॉलेज कॉर्नरवर दोघेजण बोलता उभा होते. राऊतने प्रथम त्यांच्या अंगावर ट्रक घातला. प्रसंगावधान ओळखून हे दोघे बाजूने झाल्याने बचावले. त्यानंतर राऊत आमराई, गणपती पेठमार्गे टिळक चौकात गेला. तेथून तो गावभागात घुसला.
या परिसरातील रस्ते अरूंद असल्याने नागरिकांनी घरासमोर तसेच रस्त्यावरच लहान-मोठी वाहने पार्क केली होती. राऊतने सलग सात दुचाकी वाहनांना चिरडले. याशिवाय दोन मोटारीसह एका जीपला ठोकरत नेले. यामध्ये तिनही वाहनांचा चुराडा झाला. वाहनांना ठोकरल्याचा आवाज आल्याने नागरिक जागे झाले. त्यांनी हा प्रकार पाहून ट्रकचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर गेल्यानंतर नागरिकांनी ट्रक अडविला. चालक राऊत यास खाली उतरण्यास सांगितले. पण त्याला व्यवस्थीत बोलताही येत नव्हते. तो ट्रकमधून उतरण्यास तयार नव्हता. शेवटी नागरिकांनी त्याला खाली ओढले. तो मद्यप्राशन केल्याचे लक्षात येताच त्याला चांगलाच चोप देण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दाखल झाले. त्यांनी राऊतला ताब्यात घेतले. अपघातग्रस्त ट्रकही जप्त करण्यात आला. ज्या वाहनांना ठोकरले त्यांचा पंचनामा केला. पहाटेपर्यंत पंचनाम्याचे काम सुरु होते.
वैद्यकीय तपासणी
चालक राऊत याच्याविरुद्ध मद्यधुंद अवस्थेत भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास अटक करुन न्यायालयात उभे करण्यात आले. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याने केलेल्या कारनाम्याची दहिवडी येथे नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली आहे.