राष्ट्रगीतासाठी स्तब्ध झाली सांगली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 01:01 PM2022-08-17T13:01:19+5:302022-08-17T13:02:06+5:30
एकाचवेळी स्तब्ध राहून राष्ट्रगीत गायनाचा हा पहिलाच प्रसंग असल्याने नागरिक भारावून गेले.
अविनाश कोळी
सांगली : सामुदायिक राष्ट्रगीत गायनासाठी आज, बुधवारी सांगली स्तब्ध झाली. सार्वजनिक ठिकाणांसह रस्ते, चौक तसेच घरांमध्येही सांगलीकरांनी सकाळी ११ वाजता एकाचवेळी राष्ट्रगीत सादर करुन अनोखा विक्रम केला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासनाच्यावतीने सामुदायिक राष्ट्रगीत गायनाबाबतची सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. नागरिकांनाही यासाठी आवाहन केले होते. सकाळी ११ वाजता सांगलीत भोंगा वाजल्यानंतर ठिकठिकाणी राष्ट्रगीत सुरु झाले. शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालये, क्रीडांगणे, रस्ते, चौक अशा सर्वठिकाणी राष्ट्रगीताचे गायन नागरिकांनी केले. काहींनी घरीच गायन केले. एकाचवेळी स्तब्ध राहून राष्ट्रगीत गायनाचा हा पहिलाच प्रसंग असल्याने नागरिक भारावून गेले. ठिकठिकाणी ध्वाजारोहण करुन राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
सांगलीतील अनेक रस्ते, बाजारपेठांत नेहमी वर्दळ असते. ११ वाजता राष्ट्रगीतावेळी वाहतूक तसेच बाजारपेठेतीही हालचालीही थांबल्या. शांततेत केवळ राष्ट्रगीताचा आवाज सर्वत्र येत असल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणाही देण्यात आल्या. नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ध्वनीक्षेपकांचा वापर
सांगलीच्या अनेक चौकांतील सिग्नल यंत्रणेजवळ ध्वनीक्षेपक बसविण्यात आले आहेत. त्यावरही राष्ट्रगीत लावण्यात आले. काहीठिकाणी पोलिसांच्या वाहनावरील ध्वनीक्षेपकांतून राष्ट्रगीत लावण्यात आले. नागरिकांनी सुरात सुर मिसळून राष्ट्रगीत गायन केले.
भाविकही गायनात दंग
मंदिरात देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीही उपक्रमात सहभाग घेत राष्ट्रगीत सादर केले. सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिराबाहेर शेकडो नागरिकांनी एकत्र येत ध्वनीक्षेपकाशिवाय राष्ट्रगीत सादर केले.