मुसळधार पावसाने सांगली जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:43 PM2017-08-16T23:43:56+5:302017-08-16T23:44:00+5:30

Sangli Water in the rainy season | मुसळधार पावसाने सांगली जलमय

मुसळधार पावसाने सांगली जलमय

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शहर आणि परिसराची दाणादाण उडवली. दीड तास पडलेल्या या पावसाने निम्मे शहर जलमय झाले होते. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. झोपडपट्ट्या आणि गुंठेवारीत तर दैना उडाली होती. या पावसामुळे महापालिकेच्या लाल फितीच्या कारभाराचे मात्र वाभाडे काढले.
गेल्या महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिली होती. दोन दिवसांपासून कडक उष्मा जाणवत होता. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. बुधवारीही दुपारी एक ते दीडच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. दोन वाजण्याच्या सुमारास पावसास प्रारंभ झाला. दीड तास मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेले लोक अडकून पडले. दीड तासाच्या पावसाने निम्मे शहर जलमय झाले.
जुना स्टेशन रोड ते राजवाडा चौक, महापालिका चौक, मारुती चौक, शिवाजी पुतळा परिसर, शिवाजी मंडई ते बापट बाल मंदिर शाळा, मुख्य बसस्थानक परिसर, डॉ. आंबेडकर रोड, वाहनतळ, राम मंदिर चौक, पुष्पराज चौक, पत्रकारनगर, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, न्यायालयासमोरील रस्ता या रस्त्यांवर पाणी साचल्याने ते रस्ते ब्लॉक झाले होते. याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. राजवाडा चौक ते स्टेशन चौक, आंबेडकर रस्ता आणि मुख्य बसस्थानक परिसर येथे वाहतूक ठप्प झाली होती. वाहनधारकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला.
महापालिकेच्या सांडपाणी निचरा व्यवस्थेचाही पावसाने पंचनामा केला. झोपडपट्टीवासीयांचेही हाल झाले. अनेक झोपड्यांत पाणी शिरले. गुंठेवारी भागात सांडपाणी निचºयाची व्यवस्था नसल्यामुळे तेथे पाणी साचून होते. या मुसळधार पावसाने गुंठेवारी भागातही दैना उडाली होती.
रस्ते उखडले, पॅचवर्क वाहून गेले
सांगली शहर व परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते उखडले. आधीच खड्ड्यांचे शहर म्हणून नव्याने ओळख निर्माण होत असताना, बुधवारच्या पावसाने आणखी नवीन खड्ड्यांची भर घातली. नव्याने करण्यात आलेले पॅचवर्कही या पावसात वाहून गेले. गेला महिनाभर झोपी गेलेल्या प्रशासनाने सोमवारी रात्रीपासून डांबरी पॅचवर्कचे काम हाती घेतले होते. सोमवारी रात्रीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पॅचवर्कचे काम पुन्हा बंद पडले. त्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाल्याने नव्याने केलेले पॅचवर्कही उखडले आहे.
दुचाकीस्वार जखमी
महापालिकेने अहिल्यादेवी होळकर चौक ते मंगळवार बाजार व लक्ष्मी मंदिर ते चैत्रबन नाला या रस्त्यावर मुरूम व लाल माती टाकून खड्डे मुजविले होते. लाल माती उडून डोळ्यात जात असल्याने वाहनधारकांना त्रास होत होता. त्यात बुधवारी पावसामुळे या दोन्ही रस्त्यावरील पॅचवर्कही धुऊन गेले, तर लाल मातीमुळे दुचाकी घसरून पडल्याने तिघेजण जखमी झाले. राजवाडा चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पावसामुळे एक झाड पडले, त्यात दोन दुचाकींचे नुकसान झाले.

Web Title: Sangli Water in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.