या गं या विधवा सयांनो, वडपूजनाला; सुवासिनींसारखाच दिला जाणार मान
By अविनाश कोळी | Published: June 20, 2024 07:54 PM2024-06-20T19:54:42+5:302024-06-20T19:57:07+5:30
सुवासिनींप्रमाणे विधवा महिलांनाही वडाच्या झाडाचे पूजन करण्याकरिता निमंत्रित
सांगली : पतीनिधनानंतर आठवणींच्या वेदनांसह आयुष्य जगणाऱ्या विधवा महिला समाजाच्या मान-सन्मानापासूनही दूर जातात. त्यांच्या आयुष्याला सन्मानाचे कोंदण लावण्याचा प्रयत्न सांगलीतील एका उपक्रमातून केला जात आहे. सुवासिनींप्रमाणे विधवा महिलांनाही वडाच्या झाडाचे पूजन करण्याकरिता निमंत्रित केले असून, अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन ही संकल्पना सांगलीत राबविण्यात येत आहे.
सांगलीच्या सीतारामनगरमधील एका उद्यानात हा कार्यक्रम शुक्रवारी २१ जून रोजी आयोजित केला आहे. यासाठी शहरातील ५०० विधवा महिलांना निमंत्रित केले आहे. सीतारामनगरमधील अस्मिता पत्की यांनी विधवा महिलांचे संघटन करून ‘सुवासिनी’ नावाची संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत विधवा महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून वटपौर्णिमेचा हा अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे.
वडाचे झाड हे ऑक्सिजनचा मोठा स्रोत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सर्वच महिलांना या झाडाचा सहवास हवा, अशी वैज्ञानिक जोडही या पारंपरिक सणाला देण्यात आली आहे. विधवा महिलांनी त्यांच्या पतीचे स्मरण करुन वडाच्या झाडाचे पूजन करावे, अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. विधवा महिलांनीही संस्थेचे हे निमंत्रण स्वीकारले आहे.
सणांच्या परंपरेत विधवांना मान
याच संस्थेने संक्रातीच्या सणात विधवा महिलांना निमंत्रित करून हळदी-कुंकवाचा समारंभ घेतला होता. आता सुवासिनींचा सण म्हणून ज्या वटपौर्णिमेकडे पाहिले जाते त्या सणाच्या परंपरेच्या धाग्यातही विधवा महिलांना गुंफले आहे.
सीतारामनगर येथील उषाताई आपटे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेमुळे ‘आम्ही सुवासिनी’ नावाने विधवा महिलांचे संघटन केले. आता हे संघटन व आमच्या उपक्रमातील सहभाग वाढत आहे. विधवा महिलांबाबत भेदभाव न करता त्यांनाही समाजात मान मिळायला हवा म्हणून आमची धडपड सुरू आहे.
- अस्मिता पत्की, अध्यक्षा, सुवासिनी संस्था