सांगलीचा १२८ रुपये कोटीत होणार कायापालट... पहा कोणते होणार बदल, नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:11 AM2018-12-15T00:11:14+5:302018-12-15T00:11:48+5:30
महापालिका स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी १२८ कोटींच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या प्रस्तावात अतिथिगृह व प्रसुतिगृहाच्या जागेत व्यापारी संकुल, बहुमजली पार्किंग, मटण व मच्छी मार्केट, अद्ययावत भाजी मंडई, रस्ते, शामरावनगरातील पाणी निचरा करण्यासह विविध कामांचा समावेश आहे.
सांगली : महापालिका स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी १२८ कोटींच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या प्रस्तावात अतिथिगृह व प्रसुतिगृहाच्या जागेत व्यापारी संकुल, बहुमजली पार्किंग, मटण व मच्छी मार्केट, अद्ययावत भाजी मंडई, रस्ते, शामरावनगरातील पाणी निचरा करण्यासह विविध कामांचा समावेश आहे. हे प्रस्ताव सोमवारी राज्य शासनाच्या तज्ज्ञ समितीकडे सादर केले जाणार असल्याचे सभापती अजिंंक्य पाटील यांनी सांगितले.
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या नगरोत्थान योजनेतून शंभर कोटींचा निधी जाहीर केला होता.
या निधीतून शहरातील विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. हे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्याचा विषय शुक्रवारच्या स्थायी समितीसमोर होता. त्याला मान्यता देण्यात आली. सांगलीतील अतिथिगृह व प्रसुतिगृहाची इमारत पाडून त्या ठिकाणी अद्ययावत प्रसुतिगृह व नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ४ कोटींची तरतूद केली आहे. मिरजेतील खंदकाच्या जागेत अद्ययावत भाजी मंडईसाठी १३ कोटी, मिरजेच्या तालुका क्रीडा संकुल येथील चार एकर जागेत बगीचा विकसित करण्यासाठी २ कोटी २५ लाख, पंढरपूर रस्त्यावर वारकरी भवन बांधण्यासाठी ७० लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे.
सांगली येथील भावे नाट्यगृहाच्या समोरील जागेत बहुमजली पार्किंग व्यवस्थेसाठी तीन कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. शामरावनगर येथील कोल्हापूर रोड ते कुंभार मळ्यापर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी दहा कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. जीजी मारूतीजवळ नाल्याचे सांडपाणी शेरीनाला योजनेच्या उपसा केंद्राकडे नेण्यासाठी २ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे.
सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणामध्ये कुस्ती आखाडा, कबड्डी, खो-खो मैदान विकसित करण्यासाठी पाच कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. हिराबाग वॉटर हाऊस येथील धोकादायक इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीसाठी २ कोटींचा प्रस्ताव आहे. महापालिका इमारतींच्या डागडुजीसाठी १ कोटी, लिंगायत समाज स्मशानभूमीची दुरूस्ती व संरक्षक भिंतीसाठी ५० लाख, सांगली अमरधाम स्मशानभूमीसाठी ५०, तर कुपवाड स्मशानभूमीसाठी ६० लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता मिळाली असून नगरोत्थान योजनेच्या तज्ज्ञ समितीसमोर हे प्रस्ताव सादर होणार आहेत. त्यानंतर प्रस्तावांचा प्रकल्प अहवाल तयार करून निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे सभापती पाटील यांनी सांगितले.
कुपवाडला दीड कोटीच
बैठकीत सांगलीतील गोकुळ नाट्यगृह व शिवाजी मंडईच्या विकासावर केवळ चर्चाच झाली. स्थायी समितीला मान्यता देण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये या दोन्ही जागी भाजी मंडई विकसित करण्याचा उल्लेख नाही. अॅड. स्वाती शिंदे यांनी भाजी मंडई उभारण्याचा प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी सभापतींकडे केली. तसेच अद्ययावत नाट्यगृह बांधण्यात येणार होते, मात्र नाट्यगृहाचा प्रस्ताव देखील सभेत आला नाही. तसेच कुपवाडला शहरातील केवळ दीड कोटीचे प्रस्ताव तयार केले आहेत.
शंभर टक्के निधी द्यावा : अजिंक्य पाटील
मुख्यमंत्र्यांनी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. मात्र यामध्ये सत्तर टक्के राज्य शासन, तर तीस टक्के महापालिकेचा हिस्सा आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून शंभर टक्के निधी द्यावा, अशी मागणी भाजपच्या कोअर कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे शासनाकडून शंभर टक्के निधी मिळेल व प्रकल्प मार्गी लागतील, असा विश्वास सभापती अजिंक्य पाटील यांनी व्यक्त केला.
विकास कामांचे प्रस्ताव...
प्रत्येक नगरसेवकासाठी : ५० लाख -मिरज भाजी मंडई विकसित करणे : १३ कोटी -शामरावनगर पाणी निचरा करणे : १० कोटी -सांगलीतील आंबेडकर स्टेडियम विकसित करणे : ५ कोटी -कुपवाड भाजी मंडई विकसित करणे : १ कोटी -जोतिरामदादा आखाडा विकसित व कॉम्प्लेक्स बांधणे : २ कोटी -सांगलीतील मटण व मच्छी मार्केट विकास : ३ कोटी -मिरजेतील शिवाजी क्रीडांगण विकसित करणे : ४ कोटी