सांगलीत महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:20+5:302021-06-24T04:19:20+5:30
सांगली : शहरातील संजयनगर परिसरात महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेने संतोष दीपक बोराडे (रा. सदाशिव पेट्रोलपंपामागे, ...
सांगली : शहरातील संजयनगर परिसरात महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेने संतोष दीपक बोराडे (रा. सदाशिव पेट्रोलपंपामागे, सांगली) याच्याविरोधात संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर पीडितेने याबाबत फिर्याद दिली.
------------
‘सिव्हिल’मध्ये वाहनांचीच गर्दी
सांगली : सिव्हिल रुग्णालयाच्या समोरच वाहनांचे पार्किंग करण्यात येत असल्याने वाहनांची कोंडी होत आहे. यापूर्वी मु्ख्य इमारतीच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. आता पुन्हा समोरच वाहने लावण्यात येत असल्याने रुग्णवाहिकेसह इतर वाहनांना अडचणी येत आहेत.
-----
ऑफलाइन शाळा सुरू करण्याची मागणी
सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात येत असल्याने आता नियमांचे पालन करून ऑफलाइन पध्दतीने शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी घरातच बसून असल्याने त्यांची अडचण होत आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असलेतरी त्याचा प्रभाव पडत नसल्याने नियमित शाळा सुरू करण्याची मागणी पालकांतून होत आहे.
----
कृषी दुकानातील गर्दी ओसरली
सांगली : गेल्या पाच दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने बियाणे व खते खरेदीसाठी असणारी शेतकऱ्यांची गर्दी ओसरली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता आठवडाभर पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड न करता थांबून मशागतीची कामे उरकण्यास सुरुवात केली आहे. पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानंतरच पेरण्या उरकून घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.
-----
पीकविमा मंजूर करण्याची मागणी
सांगली : सध्या खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांकडून सुुरू असल्याने शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा मंजूर करावी, अशी मागणी होत आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने पेरा धोक्यात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पिकविमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.