सांगली : संखमध्ये तरुणीचा गळा आवळून खून, बलात्काराचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:27 PM2018-07-10T14:27:19+5:302018-07-10T14:31:28+5:30
संख (ता. जत) येथील सविता संताराम सोनवणे (वय १८) हिच्या गूढरित्या बेपत्ता होण्याचे गूढ मंगळवारी सकाळी उकलले. ऊसाच्या शेतात विवस्त्रावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले.
सांगली : संख (ता. जत) येथील सविता संताराम सोनवणे (वय १८) हिच्या गूढरित्या बेपत्ता होण्याचे गूढ मंगळवारी सकाळी उकलले. ऊसाच्या शेतात विवस्त्रावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले.
जुना करजगी-संख रस्त्यावर संखपासून एक किलोमीटर अंतरावर शेतात सोनवणे कुटूंब राहते. सोमवारी दुपारी मृत सविताचे वडील आठवडा बाजारात बाजार करण्यासाठी गेले होते. तिचा एक मोठा भाऊ कोल्हापूरला परीक्षेसाठी गेला होता. दुसरा मोठा भाऊ परगावी, तर लहान भाऊ रमेश हा शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन गेला होता.
सविता घरी एकटीच होती. सायंकाळी सहा वाजता रमेश शेळ्यांना घेऊन घरी आला. घरी कोणीच नव्हते. सविता वडिलांसोबत बाजारात गेली असावी, असा अंदाज करुन रमेश घरी बसला. रात्री आठ वाजता त्याचे वडील बाजारातून आले. पण त्यांच्यासोबत सविता नव्हती. त्यामुळे रमेशने चौकशी केली. वडिलांनी सविता घरीच होती, माझ्यासोबत बाजारला आली नाही, असे सांगितले. त्यानंतर सविताचा शोध घेण्यात आला. पण तिचा कुठेच सुगावा लागला नाही.
मंगळवारी पहाटेपासून सविताचे कुटूंब व नातेवाईक तिचा शोध घेत होते. एका ऊसाच्या बांधावर सविताची चप्पल व पाण्याची घागर सापडली. शेत जमिनीतील पावलांच्या ठशावरुन नातेवाईक पिकामध्ये गेले. त्यावेळी सविताचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, उमदीचे सहाय्यक निरीक्षक भगवान शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बलात्कार करुन सविताचा खून झाल्याचा संशय आहे. उत्तरीय तपासणीतून या संशयाचे उत्तर मिळणार आहे.
याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून सोनवणे कुटूंबाचा बदला घेण्यासाठी सविताचा बळी गेल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरु आहे. त्याद्दष्टिने पोलिसांनी तपासाला दिला दिली आहे.