अवैध दारू अड्ड्यावर सांगलीच्या महिलांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 06:37 PM2019-08-17T18:37:04+5:302019-08-17T18:39:32+5:30
कडेगाव तालुक्यातील पाडळी येथील संतप्त महिलांनी एल्गार पुकारत अवैध दारू विक्री अड्ड्यावर थेट हल्ला चढवत तेथील दारूच्या बॉक्समधील बाटल्या फोडून संताप व्यक्त केला.
कडेगाव (सांगली) : कडेगाव तालुक्यातील पाडळी येथील संतप्त महिलांनी एल्गार पुकारत अवैध दारू विक्री अड्ड्यावर थेट हल्ला चढवत तेथील दारूच्या बॉक्समधील बाटल्या फोडून संताप व्यक्त केला.
पाडळी येथील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी येथील महिला वारंवार मागणी करत होत्या. मात्र, ठोस कारवाई होत नसल्यामुळे येथील महिलांनी १४ आॅगस्ट रोजी झालेल्या विशेष महिला ग्रामसभेत संताप व्यक्त केला होता. ग्रामसभेनंतर या महिलांनी उत्स्फूर्तपणे दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर मोर्चा काढला.
दारू विक्री बंद करा अशा घोषणा देत या रणरागिनीनी तेथील दारूच्या बॉक्समधील बाटल्या फोडून तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी सरपंच शुभांगी प्रताप, ग्रामपंचायत सदस्या सारिका पवार, सुनीता पवार, कांचन महिंद, राणी पाटोळे यांच्यासह गावातील २२ महिला बचत गटांमधील महिला सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत अवैध दारूविक्री बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला. यासंदर्भात चिंचणी वांगी पोलिसांना निवेदन देण्यात आले.