सांगलीत महिलांना लाखोंचा गंडा
By admin | Published: December 16, 2014 10:45 PM2014-12-16T22:45:27+5:302014-12-16T23:46:25+5:30
बोगस कर्ज : संस्थेकडून नोटिसा
सांगली : महिलांना संघटित करुन त्यांच्या नावावर सांगली जिल्हा महिला विकास को-आॅप. क्रेडिट सोसायटी या संस्थेतून लाखो रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार आज, मंगळवार उघडकीस आला. प्रत्यक्षात या महिलांना कर्जातील एक रुपायाही मिळालेला नाही. रुक्सार ऊर्फ परवीन राजेबक्ष मुल्ला (रा. चिंतामणीनगर, सांगली) या महिलेने फसविल्याची महिलांची तक्रार आहे. फसगत झालेल्या महिलांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे या महिलेवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शोभा सांगोलकर, सुशिला पाथरवट, कल्पना आटपाडे, कमल सरगर, अनुराधा शिंदे, सुवर्णा धनवडे यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, जासूद मळा, चिंतामणीनगर, राम-रहीम कॉलनी येथील महिलांना रुक्सार मुल्ला हिने संघटित केले. ‘तुम्हाला शासकीय योजनेतून लाभ मिळवून देतो’, असे आमिष दाखवून या महिलांकडून रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र व आधार कार्डच्या झेरॉक्स घेतल्या. तसेच त्यांची छायाचित्रेही घेतली. त्यानंतर सांगली जिल्हा महिला विकास को-आॅप. क्रेडिट सोसायटी या संस्थेतून या महिलांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज घेतले.
आपल्या नावावर कर्ज काढल्याची या महिलांना काहीच माहिती नव्हती. काही दिवसांपूर्वी या महिलांना एका वकिलाने पाठविलेल्या नोटिसीवरुन त्यांना ही माहिती मिळाली. (प्रतिनिधी)
चौकशीचे आदेश
महिलांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे तक्रार केली आहे. सावंत यांनी विश्रामबाग पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.