सांगली : राम कदमांच्या प्रतिमेस महिलांनी मारले जोडे, राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:36 PM2018-09-05T13:36:25+5:302018-09-05T14:11:05+5:30
तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा सांगली राष्ट्रवादी महिला आघाडीने बुधवारी निषेध व्यक्त केला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने केली.
सांगली : तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा सांगली राष्ट्रवादी महिला आघाडीने बुधवारी निषेध व्यक्त केला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने केली.
सांगली जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयासमोर महिलांनी आंदोलन केले. यावेळी एक मोठा फलक महिलांनी तयार केला होता. त्यावर राम कदम यांची छायाचित्रे व वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला होता.
हा राम नावाचा रावण आहे, एक कदम रावण की और, तुम बेटिया बचाओ, हम उनको भगायेंगे अशा प्रकारची विडंबनात्मक वाक्ये लिहून राम कदम यांचा निषेध करण्यात आला.
महिला कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारून संताप व्यक्त केला. अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणाही महिलांनी दिल्या.
यावेळी स्थायी समितीच्या माजी सभापती नगरसेविका संगीता हारगे म्हणाल्या की, गेल्या चार वर्षात महिलांवरील आत्याचारात वाढ झाली आहे. सरकारने महिलांना संरक्षण देण्याऐवजी त्यांचेच आमदार आता महिलांना पळवून नेण्याची भाषा वापरत आहेत.
राम कदम यांच्या या वक्तव्यामुळे तमाम महिलावर्ग व पालकवर्गात चिंतेचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारमधल्या व भाजपच्या एकाही नेत्याने या गोष्टीचा निषेधसुद्धा केला नाही. त्यांनी बाळगलेले मौन हे अशा आमदारांना पाठबळ देणारेच आहे. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा आता लोकांसमोर आला आहे.
महिला वर्गाबद्दल इतका वाईट विचार या सरकारमधले प्रतिनिधी करीत असतील तर महिलांनी दाद कुठे मागायची, असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
आंदोलनात शांता गायकवाड, सुरेखा मासाळ, आयशा शेख, छाया पाटील, अनिता पांगम, आशा पाटील, छाया मोरे, वैशाली करपे आदी महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
निषेध करीत राहणार!
राम कदम यांच्यासह सरकारने महिला वर्गाची तातडीने माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. सरकार माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही विविध मार्गाने सरकारच्या महिला विरोधी धोरणाचा निषेध करीत राहू, असा इशारा हारगे यांनी यावेळी दिला.