राज्य अजिंक्यपद हॅण्डबॉल स्पर्धेत मुलांत सांगली, तर मुलींत मुंबई संघाला अजिंक्यपद
By संतोष भिसे | Published: February 6, 2024 04:38 PM2024-02-06T16:38:46+5:302024-02-06T16:39:47+5:30
सांगलीत स्पर्धा, राज्यभरातून ५०० खेळाडूंचा सहभाग
सांगली : सांगलीत आयोजित राज्य अजिंक्यपद हॅण्डबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात यजमान सांगली जिल्ह्याने वर्चस्व गाजवत अजिंक्यपदाच्या चषकावर नाव कोरले. एकतर्फी लढतीत जळगाव जिल्ह्याचा १९-३ असा पराभव केला. मुलींमध्ये मुंबई व लातूर संघात तुल्यबळ लढत झाली. मुंबई शहर जिल्ह्याने लातूरचा १९-१२ असा पराभव करत जयश्रीवहिनी चषक पटकावला.
सांगली डिस्ट्रिक्ट हँडबॉल असोसिएशन आणि मदनभाऊ पाटील युवा मंचतर्फे दामाणी हायस्कूलच्या मैदानावर स्पर्धा घेण्यात आल्या. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत ५०० खेळाडू सहभागी झाले. मुलांच्या अंतिम फेरीत बलाढ्य सांगलीने जळगाववर पहिल्या मिनिटापासून दवाब निर्माण करीत मोठ्या फरकाने विजय मिळवला. विजयी संघात हर्षवर्धन करे, प्रज्वल काळे, सर्वज्ञ पाटील, मिथील जाधव यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
मुलींमध्ये लातूरच्या श्रेया पवारने एकटीने ७ गोल करीत संघासाठी किल्ला लढवला, परंतु मुंबईने सांघिक एकजुटीवर १९-१२ अशी विजयश्री खेचून आणण्यात यश मिळविले. मुंबईकडून काव्या जगतापने ६, अजिता नाडरने ६, स्वरा टक्केने ५, विर्तिका नायरने २ गोल केले.
भारती बँकेचे संचालक डॉ. जितेश कदम, डॉ. मोनिका जितेश कदम, सोनिया होळकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक प्रदान करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील, युवा मंचाचे अध्यक्ष आनंद लेंगरे, किरण जगदाळे,सुधीर सगरे, इरशाद तांबोळी, नईम नालबंद, वाय. डी. पाटील, मुख्याधापिका बी. एम. पाटील, प्रा. प्रवीण गावडे, वैभव उगळे आणि वसंत देसाई उपस्थित होते. संयोजन प्रा. जहांगीर तांबोळी, परेश पाटील, प्रा. प्रदीपकुमार चव्हाण, प्रा. स्वाती शिरोटे, प्रा. वर्षा लोखंडे, संजय पवार, धुळा इरकर यांनी केले.