सांगलीच्या स्वच्छता अभियानाचा जागतिक विक्रम, इंडिया वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रमाणपत्र
By अविनाश कोळी | Published: October 21, 2023 12:36 PM2023-10-21T12:36:59+5:302023-10-21T12:37:27+5:30
दोन हजार दिवस अखंडित मोहीम, कोणत्याही शासकीय मदतीशिवाय दड्डणावर व त्यांच्या ग्रुपने गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले
सांगली : तब्बल २ हजार दिवस अखंडित स्वच्छता अभियान राबविण्याची किमया करणाऱ्या सांगलीच्या निर्धार फाऊंडेशनची दखल इंडियाज् वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेत त्यांचा जागतिक विश्वविक्रम नोंदविला. संघटनेचे प्रमुख राकेश दड्डणावर यांच्या नावे या विक्रमाची नोंद झाली आहे.
फाऊंडेशनमार्फत दड्डणावर यांनी १ मे २०१८ रोजी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. नागरिकांना सुरुवातीला ही औपचारिकता वाटली, पण शहरातील अनेक भागांचे रुपडे बदलू लागले तेव्हा अनेक तरुण, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी त्यांच्या अभियानात सहभागी झाले. अभियानाची व्यापकता वाढत गेली. सुरुवातीला शहरापुरती मर्यादीत असणारी ही मोहीम शहरालगतच्या गावांमध्ये पोहचली. नंतर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही तिचा डंका वाजला.
आषाढी एकादशीनंतर पंढरपूरच्या मंदिर परिसरासह संपूर्ण घाट या फाऊंडेशनने चकाचक केला. त्यानंतर राज्यभरातील युवक या अभियानाशी जोडले गेले. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय दड्डणावर व त्यांच्या ग्रुपने गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले. १ मे २०१८ रोजी त्यांनी हाती घेतलेला झाडू आजही त्यांच्या हाती टिकलेला आहे. एक दिवसाचाही खंड न पाडता या तरुणांनी मोहीम राबविली. अभियानास नुकतेच २ हजार दिवस पूर्ण झाले आणि त्याचवेळी जागतिक विक्रमाची नोंद झाल्याची बातमीही फाऊंडेशनला मिळाली.