सांगली : लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 03:50 PM2018-12-26T15:50:03+5:302018-12-26T15:52:25+5:30
लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून कवलापूर (ता. मिरज) येथील प्रदीप पांडुरंग तोडकर (वय ३२) या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. शेतामध्ये तो सोमवारी दुपारी बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
सांगली : लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून कवलापूर (ता. मिरज) येथील प्रदीप पांडुरंग तोडकर (वय ३२) या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. शेतामध्ये तो सोमवारी दुपारी बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
प्रदीप तोडकर याचे कवलापुरातील दत्त मळ्यात घर आहे. आई, वडील, भाऊ, भावजय व पुतण्यासमवेत तो राहत होता. तो शेती करीत होता. त्याला लग्न करायचे होते. त्याच्यासाठी स्थळेही येत होती. पण लग्न ठरत नव्हते. भावाचे लग्न झाले, त्याला एक मुलगाही झाला; मग माझे लग्न का ठरत नाही?, या विचाराने तो चिंताग्रस्त झाला होता.
यातूनच सोमवारी दुपारी चार वाजता त्याने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. त्यामुळे तेथेच तो बेशुद्ध होऊन पडला. हा प्रकार शेतातील काही मजुरांच्या लक्षात आला. त्यांनी प्रदीपच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.
प्रदीपचा भाऊ आनंद तातडीने आला. त्याने प्रदीपला उपचारारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु ठेवले होते. पण उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. हवालदार संदीप पाटील पुढील तपास करीत आहेत.
नातेवाईकांचा जबाब
सांगली ग्रामीण पोलिसांनी मृत प्रदीपचे आई, वडील व भावाची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवून घेतले. या जबाबात त्यांनी प्रदीपला लग्न करायचे होते, स्थळेही येत होती. परंतु लग्न ठरत नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो नाराज होता. यातूनच त्याने आत्महत्या केली आहे, असे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरु ठेवला आहे.