Sangli: सेल्फी काढताना तरुण नदी पात्रात पडून वाहून गेला, सांगलीवाडीतील बंधाऱ्याजवळील घटना
By घनशाम नवाथे | Published: July 7, 2024 06:27 PM2024-07-07T18:27:29+5:302024-07-07T18:28:00+5:30
Sangli News: सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला असलेल्या बंधा-यावर मैत्रिणीसमवेल सेल्फी घेताना मोईन मोमीन (वय २४, रा. शामरावनगर) हा तरूण पात्रात पडून वाहून गेला.
- घनशाम नवाथे
सांगली - येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला असलेल्या बंधा-यावर मैत्रिणीसमवेल सेल्फी घेताना मोईन मोमीन (वय २४, रा. शामरावनगर) हा तरूण पात्रात पडून वाहून गेला. सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. मैत्रिणीने हा प्रकार नातेवाईकांना कळवल्यानंतर आयुष्य हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यू टीमच्यावतीने हरिपूरपर्यंत शोध घेण्यात आला. सायंकाळपर्यंत मोईन याचा ठावठिकाणा समजू शकला नाही.
अधिक माहिती अशी, मोईन हा सांगलीतील एका मैत्रिणीबरोबर रविवारी सकाळी नदीकाठावर आला होता. सांगलीवाडीच्या बाजूने तो मैत्रिणीसह चालत बंधाऱ्यावर आला. तेथे दोघेजण सेल्फी घेत होते. तेव्हा तोल जाऊन मोईन हा नदीपात्रात पडला. तेव्हा नदीतील पाण्याला धार असल्यामुळे त्याला बाहेर येता आले नाही. तो पाण्याबरोबर वाहून जाऊ लागला. मैत्रिणीने आरडाओरड केला. काहीजण बंधाऱ्याकडे धावले. परंतू मोईन हा पाण्याच्या धारेला लागून दूरवर गेला. मैत्रिणीने मोईनच्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. ते तत्काळ धावले. सांगली शहर पोलिसही घटनास्थळी आले. आयुष हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि महापालिका अग्निशमन दलाचे जवानही आले. त्यांनी बोटीतून हरिपूरपर्यंत शोध घेतला. परंतू तोपर्यंत नदीपात्रात पाणी वाढले होते. बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे प्रवाहाचा वेग वाढला. सायंकाळपर्यंत नदीपात्रात शोध सुरू होता.