सांगली : युवा महोत्सवाचा आज समारोप; तरुणाई रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:26 AM2018-11-02T00:26:48+5:302018-11-02T00:31:20+5:30

जोशपूर्ण लोकनृत्य, ठेका धरायला लावणारे पाश्चिमात्य समूहगीत, शास्त्रीय नृत्याचा पदन्यास, सूरमयी शास्त्रीय गायन अशा विविधांगी प्रकारातील कलेच्या तुफानाला गुरूवारी सांगलीमध्ये उधाण आले.

Sangli: Youth Festival concludes today; Youthfulness | सांगली : युवा महोत्सवाचा आज समारोप; तरुणाई रंगली

सांगली : युवा महोत्सवाचा आज समारोप; तरुणाई रंगली

Next

संतोष मिठारी/ शरद जाधव।

सांगली : जोशपूर्ण लोकनृत्य, ठेका धरायला लावणारे पाश्चिमात्य समूहगीत, शास्त्रीय नृत्याचा पदन्यास, सूरमयी शास्त्रीय गायन अशा विविधांगी प्रकारातील कलेच्या तुफानाला गुरूवारी सांगलीमध्ये उधाण आले. तरूणाईच्या कलाविष्काराने रंगलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या या ३८ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा आज, शुक्रवारी समारोप होणार आहे.

विलिंग्डन महाविद्यालयाच्या परिसरातील या मध्यवर्ती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात सकाळी दहा वाजता पाश्चिमात्य एकल गायन, वादनाने झाली. महाविद्यालयाने शताब्दी वर्षानिमित्त सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांचे व्याख्यान घेतले. त्यामुळे महोत्सवातील विविध स्पर्धा काहीवेळ स्थगित केल्या. दुपारी एकच्या सुमारास या स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात आल्या.

१)शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवात स्पर्धकांनी सप्तरंगी रांगोळीतून व्यक्तिचित्रण, निसर्ग रेखाटली. २) महोत्सवात विद्यार्थ्यांनी पाश्चिमात्य समूहगीताचे सादरीकरण केले.

खुल्या रंगमंचावर शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेत तबला, मृदंगावर हार्मोनिअम, सारंगीचा लेहरा घेत पेशकारा, रेला, कायदा, चक्रधर प्रकार स्पर्धकांनी सादर केले. दुपारी तीननंतर या मंचावर शास्त्रीय सूरवाद्य स्पर्धेत हार्मोनिअम, व्हायोलीन, सतार, बासरीच्या वादनातून कर्णमधुर सूर उमटले. वेलणकर हॉलमधील शास्त्रीय नृत्यातून महिषासूरमर्दिनी, देवी पार्वती, विष्णू आदी देव-देवतांचा महिमा उलगडला.

शास्त्रीय गायनातील विविध रागांतून स्पर्धकांनी स्वरांची मांडणी केली. यावर्षी पहिल्यांदाच महोत्सवात सहभागी केलेल्या मेहंदीची स्पर्धा प्राणीशास्त्र विभागात झाली. त्यात डोलीबारात, अरेबिक, बँगल ज्वेलरी, मोरक्कन, लेस ग्लोज प्रकारातील मेहंदी स्पर्धकांच्या हातावर रंगली. राजकारण, वाहतूक नियंत्रणाबाबत व्यंगचित्रातून वास्तव मांडण्यात आले. सप्तरंगी रांगोळीतून व्यक्तिचित्रण, निसर्ग रेखाटण्यात आला. कांतिलाल शाळेच्या परिसरातील रंगमंचावर पाश्चिमात्य समूहगीताने उपस्थितांना ठेका धरायला लावला.

सायंकाळनंतर या रंगमंच परिसरातील गर्दी वाढली. शेतकरी, धनगरी, कोळीनृत्य, लावणी, वाघ्या-मुरळी आदी प्रकारांतील लोकनृत्य स्पर्धकांनी जोशपूर्ण वातावरणात सादर केले. टाळ्या, शिट्ट्यांचा गजर, नृत्याचा फेर धरत तरूणाईने लोकनृत्याचा आनंद लुटला.


सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातील शिवाजी विद्यापीठाच्या ३८ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात गुरूवारी व्यंगचित्रांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांचा वेध स्पर्धकांनी घेतला. २) युवा महोत्सवात नव्यानेच समावेश झालेल्या मेहंदी प्रकारात कला सादर करताना तरूणींमध्ये उत्साह दिसून आला.

मध्यवर्ती युवा महोत्सवात गुरुवारी विद्यार्थिनीने शास्त्रीय नृत्य सादर केले.

 

Web Title: Sangli: Youth Festival concludes today; Youthfulness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.