बहिणीच्या लग्नासाठी गावी येत असतानाच काळाचा घाला, भावाचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 04:43 PM2022-05-06T16:43:57+5:302022-05-06T16:45:37+5:30
बहिणीच्या लग्नासाठी अक्षय गावी येणार हाेता. गावातीलच मदुराईस्थित गलाई व्यावसायिक धनाजी शिंदे-पाटील हेही गावाकडे येण्यासाठी निघाले होते. त्यांच्याच माेटारीतून अक्षयही गावी येण्यास निघाला असता ही दुर्घटना घडली.
लेंगरे : बहिणीच्या लग्नासाठी मदुराईहून गावाकडे येत असताना माेटार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात भावाचा मृत्यू झाला. अक्षय उत्तम शिंदे-पाटील (वय २१, रा. लेंगरे, ता. खानापूर, जि. सांगली), असे मृत युवकाचे नाव आहे. गलाई व्यवसायानिमित्ताने ताे मदुराई येथे राहात हाेता. ही घटना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकात चित्रदुर्गनजीक हरियूर येथे घडली. अपघातात माेटारीतील महिलेसह अन्य दाेघे जखमी झाले आहेत.
लेंगरे येथील उत्तम शिंदे यांचा मदुराईत गलाई आणि सराफ व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षांपासून मुलगा अक्षय हा व्यवसाय सांभाळत होता. अत्यंत कमी वयात यशस्वी व्यावसायिक म्हणून त्याने ओळख निर्माण केली होती. लेंगरे परिसरातही युवकांचे संघटन केले होते.
पुढच्या आठवड्यात उत्तम शिंदे यांच्या मुलीचा विवाह नियोजित होता. बहिणीच्या लग्नासाठी अक्षय लेंगरेला येणार हाेता. गावातीलच मदुराईस्थित गलाई व्यावसायिक धनाजी शिंदे-पाटील हेही गावाकडे येण्यासाठी निघाले होते. त्यांच्याच माेटारीतून (क्र. टीएन ५९ बीएच ५८१०) अक्षयही गावी येण्यास निघाला.
मंगळवार दि. ३ मे रोजी सायंकाळी धनाजी शिंदे-पाटील, त्यांची पत्नी छाया व अक्षय असे तिघेजण लेंगरेकडे येण्यासाठी मदुराई येथून निघाले. बुधवारी ४ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास कर्नाटकातील चित्रदुर्गनजीक पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हरियूर हद्दीत त्यांची माेटार समोरील ट्रकवर (क्र. टीएन ५२ एल ८४९) आदळली. अपघात इतका भीषण होता की माेटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला. नागरिकांनी तातडीने सर्व जखमींना चित्रदुर्ग येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी हलवीत असतानाच अक्षयचा मृत्यू झाला, तर धनाजी शिंदे यांच्यावर गुरुवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. छाया यांची प्रकृतीही गंभीर आहे.
नातेवाईकांची धावाधाव
दरम्यान, अपघाताची माहिती लेंगरे येथे समजताच नातेवाईकांनी चित्रदुर्ग, बंगळुरू येथील गलाई व्यावसायिकांशी संपर्क साधला. तेथून तातडीने गलाई व्यावसायिक घटनास्थळी दाखल झाले. लेंगरेतूनही तातडीने नातेवाईक चित्रदुर्गकडे रवाना झाले. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अक्षयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सकाळी लेंगरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.