पीककर्जाच्या वाटपात सांगली जिल्हा बँक आघाडीवर, चालू आर्थिक वर्षात वाटप केले 'इतक्या' कोटीचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 12:09 PM2023-03-25T12:09:48+5:302023-03-25T12:10:06+5:30

जिल्हा बँक यंदा उद्दिष्टपूर्ती करणार का, याकडे सर्वांचे लक्ष

Sangli Zilla Bank leads in disbursement of crop loans | पीककर्जाच्या वाटपात सांगली जिल्हा बँक आघाडीवर, चालू आर्थिक वर्षात वाटप केले 'इतक्या' कोटीचे कर्ज

पीककर्जाच्या वाटपात सांगली जिल्हा बँक आघाडीवर, चालू आर्थिक वर्षात वाटप केले 'इतक्या' कोटीचे कर्ज

googlenewsNext

सांगली : एकीकडे सिबिल स्कोअरवरून शेतकऱ्यांच्या पीककर्जाबाबतच्या अडचणी वाढल्या असतानाच जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात १५ मार्चअखेर २ हजार ३१८ कोटी १ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या ८१ टक्के वाटप झाले असून, यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची टक्केवारी कमी असल्याने उर्वरित पंधरा दिवसांत त्यांना उद्दिष्टपूर्तीसाठी मोठी कसरत करावी लागेल.

जिल्ह्यात वार्षिक पतपुरवठा योजनेअंतर्गत पीककर्जासाठी दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी सध्या बँकांची कसरत सुरू आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण व जिल्हा बँक अशा प्रकारांतील बँकांना त्यांच्या पीककर्जाचे उद्दिष्ट दिले होते. सर्वांत कमी उद्दिष्ट विदर्भ, कोकण ग्रामीण बँकेला असते. त्यांनी १०६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. १५ मार्चपर्यंत जिल्ह्यात पीककर्जाचे ८१ टक्के वाटप केले आहे. म्हणजेच ३१ मार्चअखेर १९ टक्के कर्जवाटप करावे लागेल.

बँकनिहाय पीककर्जाचे वाटप (१५ मार्चपर्यंत)

  • बँक प्रकार कर्जवाटप उद्दिष्टपूर्ती
  • राष्ट्रीयीकृत ५६५.६३ कोटी ७४ टक्के
  • खासगी ३७५.२८ कोटी ७४ टक्के
  • विदर्भ, कोकण ग्रामीण ४.८९ कोटी १०६ टक्के
  • जिल्हा बँक १३७१.६१ कोटी ८७ टक्के


राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांची कसरत

  • एकीकडे प्राधान्याने पीककर्ज देण्याचे आदेश दिलेले असताना राष्ट्रीयीकृत व खासगी बँका उद्दिष्टापासून दूर आहेत.
  • दोन्ही प्रकारांतील बँकांनी अद्याप ७४ टक्केच पीक कर्जपुरवठा केला आहे.
  • या बँकांना येत्या ३१ मार्चअखेर २६ टक्के कर्जपुरवठा करावा लागेल.


जिल्हा बँक उद्दिष्ट गाठणार?

दरवर्षी जिल्हा बँक पीककर्जवाटपात आघाडीवर असते. सर्व प्रकारच्या बँकांच्या एकूण कर्जपुरवठ्यापेक्षा अधिक पीककर्जपुरवठा जिल्हा बँक करते. मार्चअखेर जवळ आल्याने कमी कालावधीत अद्याप १३ टक्के पीक कर्जवाटप करायचे आहे. जिल्हा बँक यंदा उद्दिष्टपूर्ती करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वच बँकांना मार्चअखेर पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांच्याकडे प्रलंबित प्रकरणे असतील त्यांनी ती तातडीने निकालात काढावीत. कर्ज नूतनीकरणाची प्रकरणेही मार्गी लावावीत, असेही सांगितले आहे. - महेश हरणे, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक

Web Title: Sangli Zilla Bank leads in disbursement of crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.