अबब...नोकरभरतीतून सांगली जिल्हा परिषदेने केली साडेतीन कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:12 PM2023-08-31T14:12:19+5:302023-08-31T14:12:38+5:30
सुशिक्षित बेरोजगारांची शासनाकडूनही परवडच
सांगली : जिल्हा परिषदेतील रिक्त जागांच्या नोकर भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ ऑगस्टला संपल्यानंतर अखेर आयबीपीएस कंपनीकडून बुधवारी प्रशासनाला माहिती दिली. नोकरभरतीच्या ७५४ जागांसाठी ३४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यातून जिल्हा परिषदेची चक्क तीन कोटी ५० हजार रुपयांची कमाई झाली आहे. अर्जाला हजार रुपये घेऊन सुशिक्षित बेरोजगारांची शासनाकडूनही परवडच चालू असल्याबद्दल तरुणांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी भरती करण्यासाठी शासनाकडून प्रक्रिया चालू आहे. परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीची निवड केली आहे. नोकरभरतीसाठी ५ ते २५ ऑगष्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ७५४ जागांसाठी ३४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
या भरतीसाठी खुल्या गटातून अर्ज करण्यासाठी एक हजार रुपये आणि आरक्षित उमेदवारांसाठी ९०० रुपये शुल्क होते. यातून जिल्हा परिषदेला तीन कोटी ५० लाख रुपये मिळाले आहेत. यातून परीक्षेची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण आर्थिक अडचणीत असतानाच शासनाने पुन्हा अर्जाच्या शुल्क वाढीत मोठी वाढ करून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा आरोप बेरोजगार तरुणांनी केला आहे.
भरती प्रक्रियेमध्ये हंगामी फवारणीमधून आरोग्य सेवक (पु.) जागांसाठी १० हजार ९८५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. आरोग्य पर्यवेक्षक ६१, कंत्राटी ग्रामसेवक पदांसाठी चार हजार ५८७, आरोग्य सेवक (पु.) आरोग्य सेवक (म) जागांसाठी एक हजार ८७१, औषध निर्माण अधिकारी तीन हजार २०३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १२६, विस्तार अधिकारी (पंचायत) ९३३, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ३२७, विस्तार अधिकारी (कृषी) १८१, पर्यवेक्षक ४७१, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, बांधकाम) दोन हजार ७८२, कनिष्ट सहायक (लिपिक) तीन हजार ३६५, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका दोन हजार २१५, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम, लघु पाटबंधारे) एक हजार ४६० तसेच पशुधन पर्यवेक्षकांसाठी ४७१ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.
ऑनलाइन परीक्षा होणार
आयबीपीएस कंपनीकडून उमेदवारी अर्जांची संख्या जिल्हा परिषद प्रशासनाला दिली असली तरी अर्जांची छाननी, तसेच पात्र, अपात्र उमेदवारीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या प्रक्रियेनंतर संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीसाठी एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सांगितले.