सांगली जि.प. सभापती निवडीत घोरपडे गट, स्वाभिमानीला डावलले
By admin | Published: April 6, 2017 01:49 PM2017-04-06T13:49:09+5:302017-04-06T13:49:09+5:30
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी भाजपाचे ब्रम्हानंद पडळकर, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी रयत विकास आघाडीच्या सुषमा नायकवडी यांच्या बिनविरोध निवडी गुरुवारी झाल्या.
Next
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 6 - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी भाजपाचे ब्रम्हानंद पडळकर, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी रयत विकास आघाडीच्या सुषमा नायकवडी यांच्या बिनविरोध निवडी गुरुवारी झाल्या. सभापती निवडीमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला डावलण्यात आले. विषय समितीच्या सभापती निवडीमध्ये आमदार विलासराव जगताप गटाचे तमनगोंडा रवी आणि मिरज तालुक्यातून आमदार सुरेश खाडे गटाचे अरुण राजमाने यांची निवड झाली.
माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सभापती पदाची मागणी करण्यात आलेली होती, मात्र बुधवारी मुंबई मध्ये भाजपा आणि मित्र पक्षांच्या बैठकीत मित्र पक्षांची समजूत काढण्यास भाजपाला यश आले.गुरुवारी जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात सभापती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम झाला. यामध्ये विषय समित्यांची एकूण चार तर महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण सभापती पदासाठी प्रत्येकी दोन नामनिर्देशन पत्र दाखल झाले.
यामध्ये विषय समित्यांसाठी तमनगोंडा रवी, अरुण राजमाने, जितेंद्र पाटील, सतीश पवार यांचे अर्ज आले होते. तर महिला व बालल्याण सभापती पदासाठी रयत विकास आघाडीच्या सुषमा नायकवडी आणि काँग्रेसच्या कलावती गौरगौड, समाज कल्याण सभापती पदासाठी भाजपाचे ब्रम्हानंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे भगवान वाघमारे असे अर्ज आलेले होते.
अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत सत्ताधारी भाजपाला चाल देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्व अर्ज माघारी घेतले, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती पदी भाजपचे ब्रम्हानंद पडळकर तर महिला व बालकल्याण सभापती पदी रयत विकास आघाडीच्या सुषमा नायकवडी यांच्या बिनविरोध यांची बिनविरोध निवड झाली, तर विषय समित्यांसाठी तमनगोंडा रवी, अरुण राजमाने यांनाही सभापती पदाची संधी मिळाली.
निवडीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी नवनिर्वाचित सभापतीना शुभेच्छा दिल्या, तर काँग्रेस राष्ट्रवादीला मिळून काम करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, राहुल महाडिक, गोपीचंद पडळकर, दीपक शिंदे, शेखर इनामदार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड आदी उपस्थित होते.