सांगली ZP, पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर; अध्यक्षांसह १४ सदस्यांचा पत्ता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 11:43 AM2022-07-29T11:43:19+5:302022-07-29T11:44:04+5:30
३४ मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित
सांगली : जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी आणि दहा पंचायत समित्यांच्या १३६ गणांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ४२ गट सर्वसाधारण असून, ओबीसींसाठी १८, तर अनुसूचित जातीसाठी आठ गट आरक्षित राहिले आहेत. ३४ मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित आहेत. या सोडतीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापतींसह १४ सदस्यांचा पत्ता कट झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या उपस्थितीत रितेश चितरुक या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीमध्ये २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या चार निवडणुकांमधील आरक्षणाचा विचार केला आहे. अनुसूचित जातीसाठी उतरत्या क्रमाने आरक्षण निघणार असल्याने यापूर्वी ज्या गटामध्ये आरक्षण पडले होते, ते गट वगळले होते.
अनुसूचित जाती, ओबीसी आणि सर्वसाधारण अशाप्रकारे आरक्षण काढले. जिल्हा परिषदेच्या ६८ गटांपैकी तब्बल ४२ मतदारसंघ खुले झाले आहेत. त्यापैकी २१ ठिकाणी महिलांसाठी राखीव झाले. ४२ मतदारसंघात यापूर्वी झालेल्या निवडणुकीत कधीही महिलांसाठी राखीव नव्हते, ते महिलांसाठी राखीव ठेवले.
सर्वसाधारण (खुला) गट
वाळवा तालुक्यातील कासेगाव, पेठ, कुरळप, बागणी, वाटेगाव, कडेगाव तालुक्यातील तडसर, देवराष्ट्रे, आटपाडी तालुक्यातील करगणी, तासगाव तालुक्यातील येळावी, चिंचणी, कवठेएकंद, मणेराजुरी, पलूस तालुक्यातील कुंडल, अंकलखोप, जत तालुक्यातील वाळेखिंडी, मुचंडी, शिराळा तालुक्यातील पणुंब्रे तर्फ वारुण, मांगले, कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, मिरज तालुक्यातील भोसे, आरग.
सर्वसाधारण महिलांसाठी राखीव गट
आटपाडी, खानापूर तालुक्यातील भाळवणी, लेंगरे, नागेवाडी, कडेगाव तालुक्यातील कडेपूर, तासगाव तालुक्यातील विसापूर, मांजर्डे, वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष, नेर्ले, शिराळा तालुक्यातील सागाव, मिरज तालुक्यातील मालगाव, नांद्रे, कसबे डिग्रज, हरिपूर, बेडग, म्हैसाळ, कवलापूर, जत तालुक्यातील, उमदी, डफळापूर, पलूस तालुक्यातील भिलवडी, दुधोंडी.
पाच गट पुन्हा सर्वसाधारण
जिल्हा परिषदेच्या २०१७च्या निवडणुकीत ६० पैकी ३४ गट खुले होते, त्यातील पाच गट यावेळी पुन्हा सर्वसाधारण राहिले आहेत. त्यामध्ये पलूस तालुक्यातील कुंडल, अंकलखोप, वाळवा तालुक्यातील कुरळप, बागणी, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, चिंचणीचा समावेश आहे.
ओबीसींसाठी १८ मतदारसंघ
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अठरापैकी नऊ मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित करताना चिठ्ठी काढावी लागली. वाळवा तालुक्यातील बावची, चिकुर्डे, जत तालुक्यातील करजगी, माडग्याळ, बिळूर, मिरज तालुक्यातील एरंडोली, पलूस तालुक्यातील सावंतपूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची, खानापूर तालुक्यातील करंजे मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी आरक्षित राहिले. कवठेपिरान, जाडरबोबलाद, दिघंची, निंबवडे, सावळज, वाकुर्डे बुद्रुक, संख, कोकरुड आणि वाळवा हे गट ओबीसी पुरुषांसाठी राखीव राहिले आहेत.
हे मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी
अनुसूचित जातीसाठी उतरत्या क्रमाने आरक्षण निघाले. यापूर्वी ज्या गटामध्ये आरक्षण पडले होते, तो गटवगळला आहे. रांजणी (ता. कवठेमहांकाळ), बुधगाव (ता. मिरज), खरसुंडी (ता. आटपाडी) आणि बहादूरवाडी (ता. वाळवा) हे गट अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव झाले. बोरगाव (ता. वाळवा), देशिंग (ता. कवठेमहांकाळ), शेगाव (ता. जत) आणि वांगी (ता. कडेगाव) गट अनुसूचित जाती-जमाती महिलांसाठी आरक्षित झाले.