सांगलीत ‘चेनस्नॅचर’ टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:54 PM2017-09-18T23:54:56+5:302017-09-18T23:54:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करणाºया ‘चेनस्नॅचर’ टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले होते. टोळीतील चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शिराळा, कोकरूड व पलूस पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दहा गुन्हे उघडकीस आले असून, २० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
अटक केलेल्यांमध्ये माणिक ऊर्फ राघव वसंत लखे (वय ३५, रा. कासेगाव), सुनील सुखदेव काटकर (२७, काळमवाडी), नितीन जगन्नाथ यादव (वाटेगाववाडी, ता. वाळवा) व अनिल सिद्धाप्पा कोनीन-तलवार (३३, शिंदे मळा, संजयनगर, सांगली) यांचा समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सांगली तसेच शिराळा, कोकरुड व पलूस परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने लंपास करणाºया टोळीने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलीसप्रमुख शिंदे यांनी या टोळीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग टोळीच्या मागावर होता. या टोळीचे धागेदोरे हाती लागताच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी २०१२ पासून शिराळा, कोकरूड व पलूस हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली. आतापर्यंत त्यांनी दहा गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील मंगळसूत्र, गंठण, बोरमाळ, सर असे २० तोळे सोन्याचे दागिने व दोन दुचाकी असा सात लाखांचा माल जप्त केला आहे. चौघांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. आई-वडील शेतात मजुरीसाठी जातात. चौघांनी शिक्षणही पूर्ण केलेले नाही. ते दारूच्या आहारी गेले आहेत.
पोलीस निरीक्षक राजन माने, उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, सहायक फौजदार विजयकुमार पुजारी, हवालदार सागर पाटील, शशिकांत जाधव, जगन्नाथ पवार, संजय पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी अतिरिक्तजिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे उपस्थित होते.
आणखी एक टोळी गजाआड
गेल्या आठवड्यात अटक केलेल्या विश्वजित ऊर्फ रौनक खेराडकर (वय २१), रोहित ऊर्फ अभिजित चव्हाण (२०), प्रफुल्ल व्होवाळे (१९, रा. तासगाव), अनिल बाबर (३०, रा. ब्राह्मणपुरी, मिरज) या ‘चेनस्नॅचर’ टोळीकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.