सांगलीत बाप्पांचे जल्लोषी स्वागत

By admin | Published: September 6, 2016 12:36 AM2016-09-06T00:36:01+5:302016-09-06T01:17:09+5:30

उत्सवातील उत्साहाला उधाण : अवघी नगरी झाली गणेशमय, पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणुका

Sangliat Bappache Sholashi Welcome | सांगलीत बाप्पांचे जल्लोषी स्वागत

सांगलीत बाप्पांचे जल्लोषी स्वागत

Next

सांगली : ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...’चा शहरभर घुमणारा गजर...आणि गणेशभक्तांच्या उत्साहाला आलेले उधाण अशा भक्तिमय वातावरणात सोमवारी घरोघरी गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. पारंपरिक ढोल-ताशांचा ताल आणि त्यावर भक्तांनी धरलेला ठेका अशा जल्लोषी वातावरणात बाप्पांचे स्वागत करण्यात येत होते. दुपारपर्यंत ‘बाप्पा मोरया’च्या गजरात प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारनंतर सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्ती आणण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.
गणरायाच्या आगमनाची आस लागून राहिलेल्या अबालवृध्दांची प्रतीक्षा संपत अखेर सोमवारी गणरायाचे आगमन झाले. घरोघरी सकाळच्या वेळेत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. यासाठी मूर्ती कारागीरांकडे सकाळी सातपासूनच गर्दी होती. गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांचा गजर अशा उत्साही वातावरणात सांगली शहरात दिवसभर मिरवणुका सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषी वातावरणात गणेशोत्सवास सुरुवात केली. घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच शहरातील पुष्पराज चौकातील गणेशमूर्ती स्टॉलवर गर्दी केली होती. याबरोबरच इतर साहित्यांच्या खरेदीसाठी हरभट रोड, मारुती रोड, कापड पेठ, गणपती पेठ, विश्रामबाग आदी ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)


मागणी असूनही शाडूच्या मूर्ती मिळाल्या नाहीत...
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लॅस्टर आॅफ पॅरिस, रंगांसह इतर साहित्यात झालेल्या वाढीमुळे यंदा मूर्तींच्या दरात साधारणत: पन्नास ते शंभर रुपयांनी वाढ झाली होती. घरगुती गणेशमूर्तींमध्ये लहान मूर्तींच्या किंमती १७५ ते ३०० रुपयांपर्यंत होत्या. मूर्तीच्या उंचीनुसार, आकारानुसार व त्या मूर्तीवर केलेल्या आकर्षक रंगसंगतीवर दर अवलंबून होते. वेलवेटचे धोतर असलेल्या गणेशमूर्तींना विशेष मागणी होती. मात्र, या मूर्तींचा दरही इतर मूर्तींपेक्षा जादा होता. प्लॅस्टरच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मूर्तींना विशेष मागणी होती. या मूर्तींचे दर २०० ते दीड हजारापर्यंत होते. विशेष म्हणजे दुपारी एकनंतर बहुतांश ठिकाणच्या शाडूच्या मूर्ती संपल्याने निराश होऊन भाविकांना प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी कराव्या लागल्या.


उत्सवाचे अनेक रंग : भाविकांना महागाईचे चटके
१गणरायाच्या स्वागतासाठी दारात रेखाटलेली सुबक रांगोळी, अगरबत्तीचा सुगंध, प्रसादासाठी मोदकाची मेजवानी, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट आदी तयारी पूर्ण करण्यात आली होती. सायंकाळनंतर सार्वजनिक मंडळांच्या उत्साहाला उधाण आले होते.
२बाजारात उपलब्ध असलेले विविध स्वादातील मोदक, पाच फळे, नैवेद्याच्या खरेदीसाठीही नागरिकांनी गर्दी केली होती. आंबा मोदक पेढ्यांचे दर वाढल्याने खव्याच्या मोदकांना मागणी अधिक होती. काही कंपन्यांनी पॅकिंगमधील मोदकही उपलब्ध केले होते.
३फुलांच्या दरात सोमवारी वाढ झाली होती. १ फुटाच्या हाराची किंमत ३0 ते ५0 रुपये झाल्याने ग्राहकांना धक्का बसला. नेहमी या हाराची किंमत दहा ते पंधरा रुपये असते. फुलांचे दरही वाढले होते. त्यामुळे मोठ्या हारांचे दर दीडशे रुपयांवर गेले होते.

Web Title: Sangliat Bappache Sholashi Welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.