सांगलीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास, उन्हाळी सुटी : बंद घरे टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 04:59 PM2018-05-22T16:59:55+5:302018-05-22T16:59:55+5:30
उन्हाळी सुटीला कुटुंब परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरातील बंद घरे टार्गेट केली आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ राजाराम दत्तू पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा ४८ हजारांचा माल लंपास केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद आहे.
सांगली : उन्हाळी सुटीला कुटुंब परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरातील बंद घरे टार्गेट केली आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ राजाराम दत्तू पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा ४८ हजारांचा माल लंपास केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद आहे.
पाटील कुटुंबीय आकाशवाणी केंद्रामागे नवीन पाण्याच्या टाकीजवळ राहतात. ११ मे रोजी हे कुटुंब उन्हाळी सुटी असल्याने परगावी गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील साहित्य विस्कटले. लॉकरमधील २८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व वीस हजारांची रोकड असा ४८ हजारांचा ऐवज लंपास केला.
पाटील कुटुंब सोमवारी रात्री परगावाहून परतले, त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरा पाटील यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हेगारांनी घर बंद असल्याची खात्री करुनच चोरी केल्याचा संशय आहे.