स्थायीसाठी सांगलीत फिल्ंडग
By Admin | Published: August 26, 2016 12:17 AM2016-08-26T00:17:24+5:302016-08-26T01:14:07+5:30
नेत्यांच्या गाठीभेटी : जयश्रीताई पाटील, पतंगराव कदम यांना साकडे
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. नगरसेवकांनी नेत्यांच्या गाठीभेटीवर जोर दिला असून स्थायी समितीत वर्णी लागावी, यासाठी साकडे घातले आहे. दरम्यान, सभापतीपदही रिक्त होत असल्याने, आगामी सभापती कोण? याचीही चर्चा रंगली आहे. विद्यमान सदस्यांपैकी अनेकांनी पुन्हा सदस्यत्वासाठी फिल्डिंग लावल्याने नेत्यांची कोंडी झाली आहे.
स्थायी समितीतील काँग्रेसचे महापौर हारूण शिकलगार, दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे, राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, जमीला बागवान, आशा शिंदे, तर स्वाभिमानीच्या अश्विनी खंडागळे, शांता जाधव आदी आठ सदस्य निवृत्त होत आहेत. १ तारखेच्या महासभेत नव्या आठ सदस्यांची नियुक्ती होणार आहे.
काँग्रेसमधील उपमहापौर गटाला स्थायी समितीत प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. विद्यमान सदस्य दिलीप पाटील व शिवाजी दुर्वे यांनी, पुन्हा वर्णी लागावी, यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. हे दोघेही सभापतीपदाचे दावेदार आहेत. गत सभापतीपदी निवडीवेळी या दोघांच्या नावांची चर्चा होती. पण ऐनवेळी संतोष पाटील यांनी बाजी मारली.
काँग्रेसमधून अतहर नायकवडी, पांडुरंग भिसे, निरंजन आवटी यांचीही नावे चर्चेत आहेत. माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांनीही सदस्य पदासाठी फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसमधील तीन जागांचा निर्णय जयश्रीताई पाटील व पतंगराव कदम घेणार आहेत. शुक्रवारी पतंगराव कदम सांगलीत येणार आहेत. त्यांना साकडे घालण्याची तयारी इच्छुकांनी केली आहे. काँग्रेसमधीलच एका गटाकडून, विद्यमान सभापती संतोष पाटील यांनाच मुदतवाढ द्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रियंका बंडगर, युवराज गायकवाड, संगीता हारगे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य निवडीचे सर्वाधिकार आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहेत. स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज यांनी दावा केल्याने इतर सदस्यांची कोंडी झाली आहे. नगरसेवक बाळासाहेब गोंधळी, अश्विनी खंडागळे यांनी पुन्हा फिल्ंिडग लावली आहे. (प्रतिनिधी)