सांगलीत फळे, भाजीपाला मार्केटमध्ये कडकडीत बंद

By admin | Published: July 4, 2016 11:41 PM2016-07-04T23:41:39+5:302016-07-05T00:05:29+5:30

कोट्यवधीची उलाढाल ठप्प : शेतीमाल नियमन मुक्तीस विरोध

Sangliat fruits and vegetable market are closed | सांगलीत फळे, भाजीपाला मार्केटमध्ये कडकडीत बंद

सांगलीत फळे, भाजीपाला मार्केटमध्ये कडकडीत बंद

Next

सांगली : शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्याची मुभा देण्याच्या नावाखाली बड्या व्यापाऱ्यांचेच हित शासनाकडून जोपासले जात असल्याचा आरोप करीत राज्यातील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सोमवारी बंद पाळण्यात आला. शेतीमाल नियमन मुक्तीचा राज्य शासनाकडून निर्णय घेताना राज्यातील सर्व बाजार समित्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यभर पाळण्यात आलेल्या या बंदमध्ये सांगलीतील विष्णुअण्णा फळे व भाजीपाला मार्केटमधील व्यापारी व इतर घटकांनी सहभाग घेऊन कडकडीत बंद पाळला.
या आंदोलनात फळ मार्केटमधील सर्व व्यापारी सहभागी झाल्याने सोमवारी फळ मार्केटमध्ये शुकशुकाट होता. या बंदमुळे बाजार समितीची आजची एक कोटीची उलाढाल ठप्प झाली होती. दरम्यान, राज्यातील प्रतिनिधींच्या पुण्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने, आता पुन्हा एकदा ११ जुलैला बैठक बोलाविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार समितीत आणल्यानंतर त्यास रास्त भाव मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी जादा पैसे मोजावे लागत असल्याने, यास आळा घालण्यासाठी राज्य शासनाने फळे, भाजीपाला व कांदा-बटाटा आदी शेतीमाल बाजार समिती नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमन मुक्तीच्या या निर्णयाविरोधात राज्यातील बाजार समित्यांमध्ये असंतोष आहे. केंद्राच्या दबावामुळे बड्या भांडवलदार व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समित्यांचे म्हणणे आहे. या नियमनात सर्व बाजार समित्यांचा समावेश करावा, या मागणीसाठीही सोमवारी बंद पाळण्यात आला. यात फ्रूट असोसिएशनचे शिवाजी सगरे व कांदा-बटाटा असोसिएशनचे अभिनंदन निलाखे, राजेश पोपटानी व सर्व व्यापारी सहभागी झाले होते.
या बंदमुळे कांदा, बटाटा, लसूण आणि फळे व भाजीपाल्याचे व्यवहार होऊ शकले नाहीत. या बैठकीला व्यापारी, हमाल संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


मार्केटमध्ये शुकशुकाट ; शेतकऱ्याचे नुकसान
या बंद आंदोलनामुळे नेहमीच व्यापारी, शेतकरी व ग्राहकांच्या वर्दळीने गर्दी असलेल्या कोल्हापूर रस्त्यावरील विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये शुकशुकाट होता. शेतकऱ्यांनी सोमवारी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन करण्यात आले होते. पण सांगलीत आंदोलन सुरू असल्याची कल्पना नसलेल्या कर्नाटकातील एका शेतकऱ्याने कलिंगडे विक्रीसाठी आणली होती. मात्र, बंद व सध्या कलिंगडांना मागणीही नसल्याने या शेतकऱ्याचा माल अक्षरश: दोन दिवसांपासून पावसात भिजत आहे. विक्रीच्या अपेक्षेने आलेल्या या शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागले.

राज्य संघटनेच्या निर्णयाप्रमाणे सांगलीतील भूमिका
राज्याच्या बैठकीत जे निर्णय होतील, त्याची अंमलबजावणी सांगलीतही केली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या बैठकीवर पुढील आंदोलनाची दिशा अवलंबून आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

Web Title: Sangliat fruits and vegetable market are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.