सांगलीत खवा, बर्फीचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:38 PM2017-10-06T15:38:44+5:302017-10-06T15:38:44+5:30
सांगली : गुजरात आणि पुणे येथे उत्पादन झालेल्या खवा व बर्फीची एसटीतून होत असलेली वाहतूक सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी पहाटे रोखली. हिंगोली-कोल्हापूर या एसटीची तपासणी करुन पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त केला आहे.
सांगलीत दररोज एसटीतून पार्सलद्वारे खवा व बर्फीची वाहतूक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद कोडगिरे यांचे पथक गुरुवारी मध्यरात्रीपासून सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर येणाºया प्रत्येक एसटी बसवर वॉच करीत बसले होते.
शुक्रवारी पहाटे तीन वाजता हिंगोली-कोल्हापूर एसटी आली. या एसटीतून खवा व बर्फीचे पार्सल घेताना हमालांना पकडले. हमालांच्या ताब्यातून पार्सल जप्त केली. एसटी झडती घेतल्यानंतर आणीख मोठ्या प्रमाणात माल सापडला. त्यानंतर पथकाने एसटीच्या पार्सल विभागाची झडती घेतली. तिथेही दोन दिवसापूर्वीही याच एसटीतून खवा व बर्फीची आलेली पार्सल पडून होती. यातील मालही जप्त केला. एकूण पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त केला.
खवा आणि बर्फीचे एकूण सहा नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सहाय्यक आयुक्त शिवानंद कोडगिरे यांनी सांगितले.
सांगलीतील प्रज्वल जाधवर, संजय तोरडमल, अमोल जातवर यांच्या दहा व्यवसायिकांनी हा माल मागविला होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. या व्यवसायिकांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
जप्त केलेली बर्फी तीन प्रकारची आहे. यामध्ये राधाकृष्ण, राधे व गायत्री अशा नावाने पॅकींग असलेली बर्फी आहे. राधे व गायत्री बर्फीचे गुजरातमध्ये तर राधाकृष्ण बर्फीचे पुण्यात उत्पादन होते. खवाही गुजरातमध्ये उत्पादन झालेला आहे. संबंधित उत्पादकांनाही चौकशीसाठी बोलविले जाणार असल्याचे कोडगिरे यांनी सांगितले.
म्हणून झाली कारवाई
कोडगिरे म्हणाले, दुग्धजन्य पदार्थाची वातानूकुलित वाहनांमधून वाहतूक केली पाहिजे. एसटीतून वाहतूक करणे चुकीचे आहे. हा नाशवंत माल असतो. ग्राहकांना त्याची तशीच विक्री केली तर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. उत्पादक व व्यवसायिकांनी याची कोणतीही काळजी न घेता मा मालाची वाहतूक केली आहे. त्यामुळे ही कारवाई केली आहे.