सांगलीत पिस्तूल, दोन काडतुसे जप्त

By admin | Published: November 6, 2015 11:53 PM2015-11-06T23:53:18+5:302015-11-06T23:56:12+5:30

एकास अटक : पोलिसांची कारवाई

Sangliat pistol, two cartridges seized | सांगलीत पिस्तूल, दोन काडतुसे जप्त

सांगलीत पिस्तूल, दोन काडतुसे जप्त

Next

सांगली : उत्तर प्रदेश राज्यातून सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसांची तस्कर करणाऱ्या सुनील रघुनाथ जयस्वाल (वय ३०, रा. जमुना सदन सोमनाथ मंदिर रेल्वे स्टेशनजवळ देवरीया, उत्तर प्रदेश, सध्या मिश्रलाईन डेपो परशुरामवाडी, परेल टँक रोड, काळा चौकी, मुंबई) या तस्करास पकडण्यात आले आहे.
गुंडाविरोधी पथकाने सांगलीच्या रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजता ही कारवाई केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याची किंमत ७५ हजार रुपये आहे.
सुनील जयस्वाल हा रेल्वे स्टेशन परिसरात पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील भिसे, श्रीपती देशपांडे, सागर लवटे, महेश आवळे, पप्पू सुर्वे, गुंड्या खराडे, शंकर पाटील, दिलीप हिंगाणे, सुप्रिया साळुंखे यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात त्याचा शोध सुरु ठेवला.
जयस्वाल हा संशयास्पद फिरताना आढळून आला असता, त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याने कमरेला लावलेले देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात बेकायदा हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यास शनिवारी दुपारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.
अटकेत असलेल्या जयस्वालची कसून चौकशी सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून तो सांगलीत फिरत असल्याची माहिती मिळाली आहे. तो पिस्तूल कोणाला विकणार होता, याचा तपास सुरु आहे. यापूर्वी त्याने सांगलीत कोणाला पिस्तूल विकले आहे का, याची चौकशी सुरु ठेवली आहे. त्याच्याविरुद्ध कोल्हापूर, सातारा व मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांच्या तपासात अन्य काही बाबी उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार कारवाईची दिशा ठरणार आहे. (प्रतिनिधी)
पोलीस प्रमुखांचे आदेश
जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुंडाविरोधी पथक गस्त घालून गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवत आहे. गेल्या आठवड्यातही त्यांनी अंकली (ता. मिरज) येथे एक पिस्तूल जप्त केले होते.

Web Title: Sangliat pistol, two cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.