सांगलीकरांनी केलेला सन्मान अविस्मरणीय: हरिप्रसाद चौरासिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:58 PM2018-10-02T23:58:15+5:302018-10-02T23:58:19+5:30

Sangliikar's honor is unforgettable: Hariprasad Chaurasia | सांगलीकरांनी केलेला सन्मान अविस्मरणीय: हरिप्रसाद चौरासिया

सांगलीकरांनी केलेला सन्मान अविस्मरणीय: हरिप्रसाद चौरासिया

Next

सांगली : रसिकांची इतकी मोठी गर्दी आणि त्यातून मिळणाऱ्या शुभेच्छा, प्रेम हे सारेच अलौकिक आहे. सांगलीकरांनी माझ्यावर प्रेम करीत केलेला माझा हा सन्मान मी कधीच विसरू शकणार नाही, असे उद्गार जगविख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी मंगळवारी गुरुकुल संगीत महोत्सवात काढले.
सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान व पुण्यातील स्वरझंकार यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुकुलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, बॅटमिंटनपटू नंदू नाटेकर, चिन्मय मिशन संस्थेचे स्वामी तेजोमयानंद, उद्योजक नानासाहेब चितळे, प. पू. कोटणीस महाराज, झेंडे महाराज, पंडित उल्हास कशाळीकर आदी उपस्थित होते. चौरासिया यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त गुरुकुलच्यावतीने त्यांचा सत्कार नाटेकर व तेजोमयानंद यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी चौरासिया म्हणाले की, सांगलीसारख्या छोट्या शहरात वसलेले सुंदर गुरुकुल कायमस्वरुपी टिकावे आणि याठिकाणच्या अनेक पिढ्या संगीतात घडत रहाव्यात, अशी माझी इच्छा आहे.
तेजोमयानंद म्हणाले की, हरिप्रसाद चौरासियांची बासरी ब्रह्मसुखाचा अनुभव सर्वांना देत आहे. त्यांच्या मुखातून बासरीवाटे निघणारे स्वर अजून दीर्घकाळ सर्वांना सुखावत राहतील, याची खात्री वाटते.
नाटेकर म्हणाले की, चौरासियांपेक्षा मी पाच वर्षानी मोठा आहे. या वयात मी आता बॅटमिंटन खेळू शकत नाही, पण चौरासिया आजही चांगली बासरी वाजवू शकतात. संगीत आणि खेळाची तुलना केल्यानंतर मला उमगले की, खेळ संगीताच्या तुलनेत सोपा आहे.
खा. पाटील म्हणाले की, गुरुकुलला शक्य तेवढी मदत महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल. उल्हास कशाळीकर, अरुण गोडबोले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी चौरासिया यांच्याहस्ते पंडित अतुलकुमार उपाध्ये, हृषिकेश बोडस, मंगला जोशी यांचा सत्कार करण्यात आला. पहिल्या सत्रात मंजुषा पाटील यांचे शास्त्रीय गायन व भजनसंध्याने सांगलीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. मंजुषा पाटील यांनी राग मुलतानी सादर केला. दोन बंदिशी सादर करताना संवादिनीवादक तन्मय देवचके आणि तबलावादक विजय घाटे यांची जुगलबंदीही अनुभवायला मिळाली. काशिनाथ बोडस यांनी संत मीराबाई यांचे ‘म्हारे घर आवोजी’ हे भजन सादर केले. त्यानंतर राकेश चौरासिया यांचे बासरीवादन झाले. ‘वैष्णव जन तो तेने कहीये’ हे भजन सादर करून गांधींना अभिवादन करून महोत्सवाचा समारोप करण्यात आला.
मी दोनशे वर्षे का वाजवू शकत नाही?
चौरासिया म्हणाले की, सन्मानाने मी भारावून गेलो असलो तरी, मला असे वाटत आहे की, सर्वजण मला निवृत्त करायला टपले आहेत. प्रत्येकजण मला शंभर वर्षे जगण्याचा संदेश देत आहे. त्यामुळे माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, मी दोनशे वर्षे बासरी का वाजवू शकत नाही? या त्यांच्या वाक्यावर उपस्थितांत हशा पिकला.
कंदी पेढ्यांचा हार
अरुण गोडबोले यांनी चौरासिया यांना सातारच्या कंदी पेढ्यांचा हार अर्पण करुन शुभेच्छा दिल्या. चौरासिया यांनीही कौतुकाने हार न्याहाळत त्याला स्पर्श केला.

Web Title: Sangliikar's honor is unforgettable: Hariprasad Chaurasia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.