सांगलीकरांची एकतेची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:06 AM2018-01-15T00:06:58+5:302018-01-15T00:07:42+5:30

Sangliikar's unity strike | सांगलीकरांची एकतेची वज्रमूठ

सांगलीकरांची एकतेची वज्रमूठ

googlenewsNext


सांगली : समाजात असलेले समानतेचे, एकतेचे वातावरण दूषित करणाºयांना सणसणीत चपराक देत एकीची ताकद सांगलीकरांनी रविवारी दाखवून दिली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थी, तरूण, तरूणी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी एक होत समानतेचा संदेश दिला. रविवार सुटीचा दिवस आणि मकरसंक्रांतीचा सण असतानाही, रविवारी सकाळी हजारो सांगलीकर एकतेचा संदेश देत रस्त्यावर उतरले होते. स्फूर्तिदायी घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी रॅलीचे वातावरण भारावून गेले होते. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झाला.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने सद्भावना एकता रॅलीची तयारी केली होती. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सकाळपासूनच सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध घटकांतील नागरिक कर्मवीर भाऊराव पाटील चौकात एकत्र आले होते. साडेनऊच्या सुमारास आशा पाटील, शारदा भोसले, रामदास कोळी, शफीक खलिफा, अभिनंदन पाटील आदी दिव्यांगांच्याहस्ते हवेत फुगे सोडून रॅलीची सुरूवात करण्यात आली. रॅलीच्या सर्वात पुढे स्केटिंग खेळाडू होते. त्यानंतर जिल्हाधिकारी विजय काळम पाटील स्वत: हातात तिरंगा ध्वज घेऊन अग्रभागी होते. पुष्पराज चौक, पंचमुखी मारूती रोड, तरूण भारत क्रीडांगण, महापालिका चौक, राजवाडा चौक, स्टेशन रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर जाऊन रॅलीची सांगता झाली.
रॅली मार्गक्रमण करत असताना घोषणा व देशभक्तीपर गीतांनी वातावरणात उत्साह निर्माण झाला होता. पंचमुखी मारूती रस्त्यावर ठिकठिकाणी रॅलीत सहभागी नागरिकांनी खडीसाखरेचे वाटप करण्यात येत होते. रॅलीत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, राजकीय नेतेमंडळींचा सहभाग होता. विशेष म्हणजे सर्व पक्षांतील नेत्यांचा रॅलीत सहभाग असतानाही, ते कुठेही अग्रभागी नव्हते. त्यांनी रॅलीच्या शेवटीच थांबणे पसंत केले.
शिवाजी क्रीडांगणावर झालेल्या समारोप कार्यक्रमातही स्टेजवर केवळ पोलिस व प्रशासकीय अधिकारी होते. सहभागी नेतेमंडळींची स्टेजच्या समोर बसण्याची सोय करण्यात आली होती. स्टेजवरून पुन्हा एकदा तिरंगी रंगाचे फुगे हवेत सोडण्यात आले. रॅलीची शिवाजी क्रीडांगणावर सांगता होण्यापूर्वी तिथे केवळ विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील व पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर एकतेची शपथ देऊन व राष्टÑगीताने सांगता झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत रॅली पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकाºयांनी जनतेचे आभार मानले.
प्रशासनाचे : नेटके नियोजन
जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे नेटके नियोजन करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अधिकाºयांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

Web Title: Sangliikar's unity strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली