सांगलीत भारनियमनाने पाणीटंचाई

By admin | Published: June 21, 2017 12:51 AM2017-06-21T00:51:26+5:302017-06-21T00:51:26+5:30

एक्स्प्रेस फिडरचे कोट्यवधी वाया : आयुक्तांच्या नोटिशीला केराची टोपली

Sangliit Bharadmiyanan water shortage | सांगलीत भारनियमनाने पाणीटंचाई

सांगलीत भारनियमनाने पाणीटंचाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या दोन महिन्यांपासून सांगली व कुपवाड या दोन शहरातील नागरिकांना मंगळवारी पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने महापालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी एक्स्प्रेस फिडरवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण हा खर्च आता पाण्यात गेला आहे. त्यात आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पाणीपुरवठ्याची वीज खंडीत केल्यास आपत्ती निवारण कायद्यान्वये कारवाई करण्याची नोटीसही वीज मंडळाला बजाविली होती. पण या नोटिशीलाही वीज कंपनीने केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.
सांगली व कुपवाड शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी विकास महाआघाडीच्या काळात एक्स्प्रेस फिडर बसविण्यात आले. या फिडरपोटी महापालिकेने मोक्याच्या जागा वीज कंपनीला दिल्या. एक्स्प्रेस फिडर होऊन सात-आठ वर्षे होत आली, तरीही एक्स्प्रेस फिडरचा फायदा अद्यापही महापालिकेला मिळू शकला नाही. उलट वीज मंडळाने आपला स्वायत्तपणा दाखवत दर मंगळवारी कामासाठी दिवसभर भारनियमन सुरुच ठेवले आहे. यामुळे ज्या ज्या वेळेला मंगळवारी वीजपुरवठा खंडीत होतो,तेव्हा तेव्हा शहराला पाणीटंचाईची झळ बसते. केवळ मंगळवारपुरताच हा विषय मर्यादित रहात नाही. त्यानंतर सलग दोन दिवस सांगली व कुपवाडचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असतो. महापालिका प्रशासनाला, पदाधिकाऱ्यांच्या आदेशालाही वीज मंडळ जुमानतच नाही. गेल्या काही महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढते आहे.
त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे महापालिकेवर येत आहेत. त्याचीच दखल घेत काही दिवसापूर्वी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत वीज मंडळाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत वीज मंडळाला नोटीसही बजावली होती. या नोटिशीलाही वीज मंडळाने अक्षरश: केराची टोपली दाखविल्याचे दिसून येते.
त्याचा प्रत्यय पुन्हा मंगळवारी आला. दिवसभर शहराचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे सांगली व कुपवाड या दोन शहराला सकाळी आठनंतर पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दोन्ही शहरातील गावठाण व उपनगरात पाण्याची टंचाई जाणवत होती.
काही भागात महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला. सातत्याने वीज पुरवठा खंडीत होऊन त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Web Title: Sangliit Bharadmiyanan water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.