सांगलीत बंगला फोडला
By admin | Published: July 12, 2015 12:39 AM2015-07-12T00:39:54+5:302015-07-12T00:39:54+5:30
तीन लाखांचा ऐवज लंपास
सांगली : विश्रामबाग येथील वृंदावन व्हिलाज सोसायटीतील सुदत्त श्रीराम पाठक यांचा ‘अनुबंध’ बंगला फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, १५ हजारांची रोकड असा तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याबाबत विश्रामबाग पोलिसांत नोंद आहे.
पाठक कुटुंब ३ जुलैला सायंकाळी साडेसहा वाजता बंगल्याला कुलूप लावून पुण्याला गेले आहे. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून लॉकरमधील रॅडो कंपनीची दोन घड्याळे, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या दोन मनगट्या, चांदीच्या देवाच्या मूर्ती, करदोडा, पदक अशी एकूण एक किलो चारशे ग्रॅम चांदी, १५ हजारांची रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केले.
शुक्रवारी सायंकाळी शेजाऱ्यांना पाठक यांच्या बंगल्याचा दरवाजा उघडा दिसला. कुलूप तोडलेले दिसताच त्यांना चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी पाठक यांच्याशी संपर्क साधला. पाठक यांनी त्यांच्या मेहुण्याशी संपर्क साधून बंगल्यात जाण्यास सांगितले. रात्री उशिरा मेहुणे बंगल्यात आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना पाचारण करण्यात आले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास पाचारण केले होते, पण श्वान बंगल्याच्या परिसरातच घुटमळले. ठसेतज्ज्ञांना चोरट्यांचे ठसे मिळाले आहेत. त्याआधारे तपास सुरू आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. शनिवारी सकाळी पाठक यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)