सांगलीत नगरसेवकाचे शोलेस्टाईल आंदोलन, महापालिकेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:53 PM2018-01-12T14:53:42+5:302018-01-12T16:34:07+5:30
पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देत शुक्रवारी सांगलीतील गुलाब कॉलनीच्या पाण्याच्या टाकीवर चढत नगरसेवक राजू गवळी यांच्या नेतृत्वाखाली शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.
सांगली : पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देत शुक्रवारी सांगलीतील गुलाब कॉलनीच्या पाण्याच्या टाकीवर चढत नगरसेवक राजू गवळी यांच्या नेतृत्वाखाली शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी महापालिकेच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या. कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना घेरावही घालण्यात आला. अखेर येत्या चार दिवसांत या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सांगली शहरातील गुलाब कॉलनी, त्रिमुर्ती कॉलनी, शंभरफुटी रस्ता, रामकृष्ण परमहंस सोसायटी या परिसरात गेल्या सात दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा पाणीच येत नसल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू गवळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
गुलाब कॉलनीतील पाण्याच्या टाक्यावर नगरसेवक गवळी व नागरिक चढले. तब्बल दोन तास घोषणाबाजी सुरू होती. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये आंदोलनस्थळी आले. त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी त्यांना दाद दिली नाही. पाण्याच्या टाक्यावरून खाली उतरण्याची विनंतीही फेटाळली. अखेर उपाध्ये स्वत:च पाण्याच्या टाकीवर चढले. तिथे नगरसेवक गवळी व नागरिकांची समजूत काढून त्यांना खाली आणले.
याबाबत राजू गवळी म्हणाले की, गेल्या सात दिवसांपासून या परिसरात पाण्याचा पुरवठा खंडीत झाला आहे. महापालिकेचे उपअभियंता संजय धर्माधिकारी यांना वारंवार सांगूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. धर्माधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यानेच आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. कार्यकारी अभिंयता उपाध्ये यांनी चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली आहे. त्यानंतरही पाणी आले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.
गळती, स्वच्छतेच्या कामावरून अपुरा पुरवठा : उपाध्ये
महापालिकेने हिराबाग, जलभवन येथील पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. हिराबाग येथील दुरुस्तीचे काम १९ तास चालले. त्यानंतर नदीकाठावरील जॅकवेलच्या वाहिनीला गळती लागली. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे गुलाब कॉलनीतील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरू शकली नाही.
महापालिकेने संप व पंपातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे काही भागात अपुरा पुरवठा होत आहे. तर काही भागात पाणीच गेलेले नाही. अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. संजय धर्माधिकारी यांनी या परिसरातील पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना समज दिली जाईल, असे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी सांगितले.