सांगलीत गुन्हेगारी टोळ्या सुसाट! गुन्ह्यांचा आलेख वाढला : दररोज घरफोडी, वाटमारी; खुनीहल्ल्यांचे प्रमाण; पोलिसांसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:51 PM2017-12-15T23:51:30+5:302017-12-15T23:54:03+5:30
सांगली : घरफोडी, वाटमारी, चोरी, चेन स्नॅचिंग आणि खुनीहल्ला... या गुन्ह्यांची मालिकाच सध्या सांगली-मिरज शहरांत सुरू आहे. दररोज घरफोडी आणि वाटमारीचा गुन्हा घडतच आहे.
सचिन लाड ।
सांगली : घरफोडी, वाटमारी, चोरी, चेन स्नॅचिंग आणि खुनीहल्ला... या गुन्ह्यांची मालिकाच सध्या सांगली-मिरज शहरांत सुरू आहे. दररोज घरफोडी आणि वाटमारीचा गुन्हा घडतच आहे. खुनीहल्ले केले जात आहेत. मिसरुडही न फुटलेली पोरे खिशात चाकू घेऊन फिरत आहेत. सर्वसामान्यांना सुरक्षिततेची भावना वाटत नाही, असे सध्याचे चित्र आहे. पोलिस आहेत, पण ते रस्त्यावर दिसत नाहीत. नेमकी हीच संधी साधून चोरटे बंद बंगले व फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास करीत आहेत.
सांगली शहर उपविभागीय क्षेत्रात अर्धा डझनहून अधिक खून झाले. खुनीहल्ला, मारामारी या घटना तर नित्याच्याच बनल्या आहेत. घरफोड्यांची तर मालिकाच सुरू आहे. महिला प्रवाशांना टार्गेट करून त्यांचे दागिने लंपास केले जात आहेत. फाळकूटदादांनी धिंगाणा घातला आहे. वाटमारीतून एका हॉटेल कामगाराचे अपहरण करुन त्याचा निर्घृण खून झाला. दुचाकी घासून का मारली, या कारणावरून एकावर खुनीहल्ला झाला. गुंड छोट्या बाबर टोळीने एकाच दिवसात चौघांवर खुनीहल्ले केले.
आठवडा बाजारात मोबाईल लंपास केले जात आहेत. दररोज घरासमोर लावलेल्या दुचाकी पळवल्या जात आहेत. घडलेला गुन्हा दाखल करण्याशिवाय सध्या पोलिस काहीच करताना दिसत नाहीत. नूतन जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांना येऊन एक महिना होत आला आहे. गुन्ह्यांचा आलेख रोखण्यासाठी त्यांनी अधिकाºयांची बैठक घेतली. काही सूचना, मार्गदर्शन केले. नवीन आदेशही दिले. पण परिस्थिती जैसे-थे आहे.
दोन डझन : घरफोड्या
गेल्या महिन्याभरात सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका हद्दीत दोन डझनवर घरफोड्या झाल्या आहेत. बंद बंगले व फ्लॅट फोडले. कॉलेज कॉर्नरवरील कर सल्लागार सुहास देशपांडे यांच्या बंगल्यात दरोडा पडला. याबाबत त्यांच्या कामगाराला अटक केली. पण त्याने गुन्हा कबूल केला नाही. त्यामुळे गूढ कायम आहे. सर्व घरफोड्यांमधून जवळपासून ४० लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांना एकाही घरफोडीचा छडा लावता आलेला नाही. घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत.
तब्बल ४३ दुचाकी लंपास
महापालिका क्षेत्रात महिन्याभरात ४३ दुचाकी लंपास झाल्या आहेत. पूर्वी रुग्णालय, बसस्थानक, रेल्वे स्थानक, चित्रपटगृह येथील पार्किंगमधून दुचाकी लंपास केल्या जात असत. सध्या घरासमोर लावलेल्या दुचाकीही चोरटे लंपास करीत आहेत. शहरात दररोज दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या आठवड्यात दुचाकी चोरट्यांना पकडले. मात्र त्यांच्याकडून शहरात घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लागला नाही.
खुनीहल्ले धक्कादायक
खुनीहल्ल्यांचे प्रमाण धक्कादायक आहे. महिन्याभरात डझनभर खुनीहल्ले झाले. गुंड छोट्या बाबर टोळीने एका दिवसात चौघांवर हल्ला केला. संजयनगर व विश्रामबाग हद्दीत अर्ध्या तासात दोन हल्ले झाले. एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत गुन्हेगारी टोळ्या धाडस करीत आहेत.
वाटमारी टोळीची दहशत
सध्या शहरात वाटमारी करणाºया टोळीची प्रचंड दहशत वाढली आहे. महिन्याभरात वाटमारीच्या अर्धा डझन घटना घडल्या. यातील दोन घटनांमध्ये गुन्हेगारांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. शिंदे मळ्यात रेल्वे ब्रीजजवळ १३ ते १४ वर्षाच्या तीन मुलांनी एका प्रवाशाला चाकूच्या धाकाने लुटले. तंबाखू मागण्याचा, पत्ता विचारण्याचा बहाणा करुन लोकांना थांबविले जाते. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून लुटले जाते. अशा अनेक घटना पोलिस दफ्तरी नोंदच झालेल्या नाहीत.
‘चेन स्रॅचिंग’चे प्रकार वाढले
महिलांना ‘टार्गेट’ करून त्यांच्या गळ्यातील दागिने लांबवले जात आहेत. महिन्याभरात ‘चेन स्नॅचिंग’चे तीन गुन्हे, पर्स लंपासच्या दोन घटना घडल्या. आठवडा बाजारातही महिलांचे दागिने पळवले जात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत गुन्हेगारीचा आलेख कमी असल्याचा दावा वरिष्ठ पोलिस अधिकारी करीत होते. पण अनिकेत कोथळे प्रकरणानंतर वाढलेला गुन्हेगारीचा आलेख पाहता, गुन्हेगारांपुढे पोलिसांनीही हात टेकले आहेत. वर्षाखेरीस गुन्ह्यांच्या आकड्यांनी रेकॉर्ड मोडले असेल.