सांगलीत ‘एका मिनिटात ज्ञानेश्वरी’
By admin | Published: August 24, 2016 10:47 PM2016-08-24T22:47:50+5:302016-08-24T23:44:50+5:30
सांगली शिक्षण संस्थेचा उपक्रम : ९ हजार ७३७ विद्यार्थ्यांचा सहभाग
सांगली : ‘बोला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ अशा जयघोषात येथील सांगली शिक्षण संस्थेच्यावतीने ‘एक तरी ओवी... एका मिनिटात संपूर्ण ज्ञानेश्वरी...’ हा उपक्रम बुधवारी पार पडला. या उपक्रमाची सुरुवात १४ जुलैला करण्यात आली होती, तर याची सांगता बुधवारी झाली. संस्थेने पुरविलेल्या कागदावर ९ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी एकाचवेळी एका मिनिटात एक ओवी लिहून विक्रम प्रस्थापित केला.
ज्ञानेश्वरीस नुकतीच ७२५ वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधत इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या ९ हजार ७३७ विद्यार्थ्यांना सहभागी करून यापूर्वी कधीही न झालेला ‘एक तरी ओवी... एका मिनिटात संपूर्ण ज्ञानेश्वरी...’ उपक्रम राबविण्यात आला. १४ जुलैला एक ओवी ठळक दिसणारी आणि सुलेखन वहीप्रमाणे नऊ ओव्या असलेली बत्तीस पानांची वही आणि जेल पेन विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत देण्यात आले होते. त्यामार्फत एका मिनिटात एक ओवी गिरवण्याचा सराव झाला होता. बुधवारी संस्थेच्या २३ शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकाचवेळी सकाळी ८.३९ ते ८.४० या वेळेत एका मिनिटात एक ओवी लिहिली आणि एका मिनिटात ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली.
त्यानंतर ८.४२ ते ८.४३ या वेळेत पुन्हा ज्ञानेश्वरीची दुसरी प्रत पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या संपूर्ण ज्ञानेश्वरीची एक प्रत आळंदी येथे ज्ञानेश्वरांच्या चरणी संस्थेच्यावतीने अर्पण करण्यात येणार असून, दुसरी प्रत संस्थेकडे संग्रही ठेवण्यात येणार आहे. हा उपक्रम ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत, संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर, उपाध्यक्ष जनार्दन लिमये, कार्यवाह शशिकांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्ण करण्यात आला.
यावेळी नीना राऊत, संचालक अरविंद मराठे, विजय भिडे, श्रीराम कुलकर्णी, अरुण दांडेकर, अनिता कुलकर्णी, अनघा कुलकर्णी, केदार रसाळ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)