जिल्ह्यातील सराफांचा सांगलीत मोर्चा अबकारीला
By admin | Published: March 16, 2016 08:28 AM2016-03-16T08:28:02+5:302016-03-16T08:29:50+5:30
विरोध : तेरा दिवसांच्या बंदमुळे पाचशे कोटींची उलाढाल ठप्प
सांगली : सुवर्ण व्यवसायावरील एक टक्का अबकारी कर रद्द करावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांनी मंगळवारी सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध केला. अबकारी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी २ मार्चपासून सराफांचा बेमुदत बंद सुरू असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील पाचशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. मंगळवारी सांगली जिल्ह्यातील सराफांनी महाराष्ट्र सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर पंडित, गणेश गाडगीळ, बाबूराव जोग, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पेंडूरकर, पंढरीनाथ माने, अतुल महामुनी, शंकरशेठ पवार, सचिन परदेशी, प्रसाद दीक्षित, सावकार शिराळे, विश्वास जोग, सचिन शेटे, राजेंद्र ओस्तवाल, पंढरीनाथ दीक्षित आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चाची सुरुवात सांगलीतील सराफ कट्टा येथून झाली. यावेळी ‘रद्द करा, रद्द करा, अबकारी कर रद्द करा’, ‘नवस बोला देवाला, अक्कल येऊदे सरकारला’, ‘अन्यायकारक अबकारी कर लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!’, ‘अबकारी कर रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, अशा घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी सराफ असोसिएशनचे प्रसाद धर्माधिकारी म्हणाले की, सराफांनी तेरा दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एवढ्यावर जर सरकारला जाग आली नाही, तर दोन दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शिवसेनेचे पृथ्वीराज पवार म्हणाले की, थोर नेत्यांची नावे घेऊन आणि जनतेला परदेशातील काळा पैसा आणण्याची मोठी आश्वासने देऊन हे सरकार सत्तेवर आले. पण, सत्तेवर आल्यानंतर त्यांना काळ्या पैशाचा विसर पडला आहे. शिवसेना खासदार तुमच्या मागण्यांबाबत लोकसभेत आवाज उठवतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावीर पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील यांनीही सराफांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. आंदोलनामध्ये संजय भगत, प्रसाद दीक्षित, संतोष जोशी, जगन्नाथ सुर्वे, सुनील गाडवे, प्रवीण पोतदार, सुनील चिपलकट्टी, भूषण जोशी, किरण पाटील, बाळासाहेब पाटील, सत्यजित पोतदार, रामदास देवकर, शशिकांत पाटील, राजाराम जाधव, दीपक मुळीक, राहुल कोठावळे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) मिरजेत रेल रोको आंदोलन : धर्माधिकारी आपण दुकाने बंद ठेवल्याने केंद्र शासन मागण्या मान्य करेल, असे वाटत नाही. सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. म्हणून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील सर्व सराफांनी मिरज येथे एकत्रित येऊन रेल्वे रोको आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लगेच सरकारला त्याची झळ पोहोचेल आणि सराफांच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे प्रसाद धर्माधिकारी यांनी भाषणात सांगताच, सराफांनी टाळ्या वाजवून त्यास होकार दिला. आर्थिक नुकसान : आणखी वाढणार जिल्ह्यातील सराफांचे दि. २ मार्चपासून दुकाने बंद ठेवून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सराफ पेठेतील सुमारे पाचशे कोटींची उलाढाल ठप्प झाली असण्याची शक्यता जिल्हा सराफ समितीचे सचिव पंढरीनाथ माने यांनी व्यक्त केली आहे. केंद्र शासनाने आंदोलनाबाबत तोडगा काढला नाही, तर सराफांचे आर्थिक नुकसान वाढतच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.