सांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली, विविध संघटनांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:57 PM2019-07-01T13:57:50+5:302019-07-01T13:58:55+5:30
लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने रविवारी सांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली काढण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
सांगली : लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने रविवारी सांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली काढण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
रविवारी सकाळी ११ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा येथून रॅलीस सुरुवात झाली. हौसाताई पाटील, शांताबाई कराडकर आणि प्रमिला लाड यांच्याहस्ते प्रबोधन मशाल पेटवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे, अॅड. के. डी. शिंदे, नामदेव करगणे, सुभाषराव पाटील, व्ही. वाय. पाटील, अॅड. अजित सूर्यवंशी, अॅड. तेजस्वीनी सूर्यवंशी, संपतराव गायकवाड, कॉ. शंकर पुजारी, कॉ. सुमन पुजारी, नितिन चव्हाण, डॉ. संजय पाटील, आशा पाटील, शाहिन शेख, सुनील गुरव आदी उपस्थित होते.
रॅलीमध्ये ढोल, झांजपथक, हलगी व जिवंत देखावे सहभागी झाले होते. मराठा सेवा संघ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, राष्टसेवा दल, संभाजी ब्रिगेड प्रवासी संघटना, सांगली जिल्हा प्रवासी संघटना, नरवीर उमाजी नाईक ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांच्यासह विविध सामाजिक व पुरोगामी संघटना सहभागी झाल्या होत्या. अग्रभागी रथ आणि त्यामागे सजविलेली वाहने होती. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते रॅलीत लक्षवेधी ठरले.
भगवे फेटे, पांढरा कुर्ता-पायजमा घालून कार्यकर्ते उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांची छायाचित्रे तसेच आ. ह. साळुंखे यांच्या विविध पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे फलकही वाहनांवर लावण्यात आले होते. विश्रामबाग, मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर चौक, पंचमुखी मारुती रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याजवळ रॅली आली. याठिकाणी शिवरायांना अभिवादन करून रॅली स्टेशन चौकमार्गे आमराई येथील हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे यांच्या पुतळ््यास अभिवादन करून शांतिनिकेतन येथे आली. याठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली.