सांगलीत कृष्णेची पाणी पातळी २३ फुटांवर
By admin | Published: August 5, 2016 01:05 AM2016-08-05T01:05:15+5:302016-08-05T02:03:04+5:30
वेगाने वाढ : दिवसभर रंगला ऊन-पावसाचा खेळ; चोवीस तासात नदीचे पाच फुटाने पाणी वाढले
सांगली : चांदोली धरणातील विसर्गामुळे वारणेचे पाणी पात्राबाहेर पडले असतानाच, आता संततधार पावसाने कृष्णेच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी आता २३ फुटांवर गेली आहे. चोवीस तासात पाच फुटाने पाणी वाढले आहे. पावसाचा जोर कायम राहिला, तर शुक्रवारी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या चार दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने जोर लावला आहे. त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यातच चांदोली धरणातील विसर्गामुळे आता हरिपुरातील संगमाच्या ठिकाणी वारणा नदीच्या पाण्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे हरिपूर ते मिरज या पट्ट्यात नदीचे पात्र विस्तारत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ बुधवारी सायंकाळी १८ फूट पाणी पातळी होती. गुरुवारी सायंकाळी ती २३ फुटांवर गेली होती. त्यामुळे कृष्णाकाठीही आता चिंतेचे वातावरण पसरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जुलैप्रमाणेच आॅगस्टमध्येही शहराच्या नदीकाठच्या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी झाला, तर पुराचा धोका टळू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या लोकांचे लक्ष पावसाकडे आणि वाढणाऱ्या नदीच्या पाणी पातळीकडे लागले आहे.
गेल्या चोवीस तासात सांगली, मिरज, इस्लामपूर, पलूस, तासगाव, शिराळा, विटा याठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या. सांगली, मिरज परिसरात गुरुवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. काहीवेळ इंद्रधनुष्यानेही या वातावरणात रंग भरले.
पावसाचा मुक्काम कायम असल्याने सांगली, मिरजेला जलमय स्वरुप प्राप्त झाले आहे. रस्ते, क्रीडांगणे, सखल भाग, गुंठेवारी, खुले भूखंड, प्लॉट अशा सर्वच ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहिले आहे. पावसामुळे शहरातील वाहतूक गुरुवारी तिसऱ्यादिवशीही विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनधारकांचे हाल सुरू आहेत. (प्रतिनिधी)
‘चांदोली’त अतिवृष्टी : वारणा पात्राबाहेर
वारणावती : चांदोली धरण परिसरात सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने तीन दिवसात २.८ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. पावसामुळे वारणा धरणात प्रचंड प्रमाणात पाणी येत असल्याने धरणाच्या वीज निर्मिर्ती केंद्रातून ८६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे. शिराळा तालुक्याचे पश्चिम विभागात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अतिवृष्टी झाली आहे. गेल्या चोवीस तासात ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एकू ण १७४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात सलग चार दिवस पावसाचा जोर कायम असल्याने अतिवृष्टीची नोंद झाली होती. यावेळीही सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने अतिवृष्टी होत आहे. यामुळे चांदोली धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. वाढत्या पाण्याचा विचार आणि मुसळधार पाऊस यामुळे जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू क रण्यात आला आहे. ८६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग व ओढ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. वारणा नदीच्या पोटमळीतील ऊस व भात पिकात पाणी घुसले आहे.