काँग्रेसचा सांगलीत मोर्चा
By admin | Published: June 25, 2016 12:02 AM2016-06-25T00:02:38+5:302016-06-25T00:48:22+5:30
आंदोलनाची तीव्रता वाढविणार : ‘म्हैसाळ’चे कार्यालय स्थलांतर
सांगली : कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेचे सांगलीतील मंडळ कार्यालय यवतमाळला हलविण्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी कॉँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील कॉँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी झालेल्या सभेत ‘वालचंद’मध्ये घुसून ताबा घेणाऱ्या खासदारांंना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा आरोप माजी खासदार प्रतीक पाटील यांनी केला.
ताकारी व म्हैसाळ या दोन दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या योजना असून, यामुळे त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या दोन्ही योजनांचे काम अजूनही अपूर्ण असल्याने मंडळ कार्यालय सांगलीतच आवश्यक असताना शासनाने हे कार्यालय यवतमाळला स्थलांतर करण्याचे आदेश दिले असून, १ जुलैपासून कार्यालय स्थलांतरित होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात कॉँग्रेसने मोर्चा काढला. स्टेशन चौकातून निघालेल्या या मोर्चात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ताकारी योजनेचे अजूनही ३३०.७९ कोटींची कामे बाकी असून, ती पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता आहे, तर म्हैसाळ योजनेचेही ८१६९७ हेक्टर क्षेत्र असून, अद्यापही ४६८३५ हेक्टर म्हणजेच ५७ टक्के क्षेत्राचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. मुख्य कालव्याची कामे पूर्ण झाली असली तरी पोटकालव्याची व पुढील कालव्यांची कामे पूर्ण झालेली नसल्याने मंडळ कार्यालय सांगलीतून हलवू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिरज येथील सभेत ताकारी, म्हैसाळ योजनांना भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाच्या जोरावरच जिल्ह्यात भाजपचे खासदार व आमदार निवडून आले आहेत मात्र, त्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका यावेळी करण्यात आली.
मोर्चामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आनंदराव मोहिते, शैलजा पाटील, माजी आ. हाफिज धत्तुरे, सुरेश शिंदे, प्रकाश कांबळे, संजय हजारे, सुभाष खोत, अण्णासाहेब कोरे, अमर पाटील, जत कॉँग्रेसचे पी. एम. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)