रावसाहेब दानवेंविरुद्ध सांगलीत उद्रेक

By admin | Published: May 12, 2017 11:14 PM2017-05-12T23:14:06+5:302017-05-12T23:14:06+5:30

रावसाहेब दानवेंविरुद्ध सांगलीत उद्रेक

Sangliit outbreaks against Raosaheb Demon | रावसाहेब दानवेंविरुद्ध सांगलीत उद्रेक

रावसाहेब दानवेंविरुद्ध सांगलीत उद्रेक

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सांगलीत शुक्रवारी दुसऱ्यादिवशीही उद्रेक झाला. शिवसेनेने याचा निषेध करीत स्टेशन चौकात मुंडण आंदोलन केले, काँग्रेसने काँग्रेस भवनसमोर दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने कार्यालयासमोर निदर्शने केली.
तूर खरेदीवरुन दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण राज्यभरातून निषेध होत आहे. गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीत दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर शुक्रवारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसही दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरली. शिवसेनेच्यावतीने स्टेशन चौकातील गणेश मार्केटसमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांमुळे कृषिप्रधान देश टिकून आहे. शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत. पण दानवेंना शेतकऱ्यांविषयी कळवळा दिसत नाही. यातूनच त्यांनी चित्रपटातील अभिनेत्यासारखा शेतकऱ्यांबद्दल ‘डायलॉग’ मारला. दुष्काळ व कर्जामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यांना आधार देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम दानवेंनी केले आहे, असा अरोप करत याचा निषेध म्हणून सेनेने दानवेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांचे श्राद्ध घालीत मुंडण आंदोलन केले. या आंदोलनात महादेव मगदूम, जितेंद्र शहा, संदीप शिंत्रे, अशोक कासलीकर, आदिनाथ अजेटराव, प्रभाकर कुरळपकर, सचिन ढेरे, संजय जाधव आदी सहभागी झाले होते.
काँग्रेसतर्फे काँग्रेस भवनसमोर दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला. यावेळी निदर्शनेही करण्यात आली. सत्तेची हवा डोक्यात असल्याने दानवेंची शेतकऱ्यांना शिवी देण्यापर्यंत मजल गेली आहे. दानवे व सत्ताधारी भाजपने राज्यातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तुरीला योग्य भाव दिला नाही, तर काँग्रेस गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल. दानवेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असा कार्यकर्त्यांनी इशारा दिला. या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कय्युम पटवेगार, रफीक मुजावर, राजन पिराळे, पैगंबर शेख आदी सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करुन निदर्शने करण्यात आली. दानवे भाजपमध्ये मोठ्या पदावर आहेत. एका संस्कारित पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी त्यांना केलेली शिवीगाळ अत्यंत तिरस्करणीय असल्याचा आरोप महिलांनी केला.
या आंदोलनात सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षा डॉ. छाया जाधव, जयश्री सावंत, अनिता पांगम, आयेशा शेख, वंदना चंदनशिवे, कांचन पळसे, लता कुकडे, मीनाक्षी आरते, लक्ष्मी गडकरी, नलिनी सपाटे, उषा पाटील, कविता पाटील, अरुणा खेमलापुरे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Sangliit outbreaks against Raosaheb Demon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.