मुंबईतील मासळी मार्केट बंदचा सांगलीकरांनाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:19 AM2021-07-11T04:19:08+5:302021-07-11T04:19:08+5:30
कोकरुड : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील मासळी मार्केट सोमवार, १२ पासून कायमचे बंद होणार असल्याने सातारा, सांगली, जिल्ह्यातील २५ हजारपेक्षा ...
कोकरुड : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील मासळी मार्केट सोमवार, १२ पासून कायमचे बंद होणार असल्याने सातारा, सांगली, जिल्ह्यातील २५ हजारपेक्षा जास्त नागरिकांवर कोरोना काळात उपासमारीची वेळ आली आहे. याच परिसरात मार्केटसाठी जागा मिळण्याची मागणी करण्यात आली असून, तीनही जिल्ह्यांतील नेत्यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन आणि मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून मासळी मार्केट सुरू आहे. येथे भाऊचा धक्का, कुलाबा, ससून डॉकमधून दररोज कोळी बांधव बोटीतील माल घेऊन येत असल्याने या मार्केटमध्ये व्यापारी, दलाल, पाटीवाले, फेरीवाले, हातगाडी, किरकोळ विक्रेते अशा ७० ते ८० हजार लोकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर होत असतो.
येथे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील २५ हजारपेक्षा जास्त लोक हातगाडी, फेरीवाले, पाटीवाले म्हणून मोठ्या संख्येने काम करत असतात. याच भागातील कोळीवाडा, वडगादी, भात बाजार, तांबे काटा, सायन, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, मानखुर्द या परिसरातील झोपडपट्टीत राहून मासळी मार्केटमध्ये काम करत असतात. मात्र आठ वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक ठरवत पाच मजली इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे. सोमवार, १२ जुलै हा अंतिम दिवस असल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
चाैकट
खर्च तिप्पट होणार
मुंबई पालिकेने मासळी मार्केटसाठी कांजूरमार्ग, ऐरोली, मुलुंड, मरोळ, फोर्ट मंडई, मिर्झा गालिब मंडई आणि कुलाबा मंडई या काही मोकळ्या जागा सुचवल्या आहेत. मात्र या जागा रेल्वे स्टेशनपासून दूर असल्याने स्थानिक मालाबरोबरच परराज्यातून येणाऱ्या मालाची वाहतूक खर्च वाढून तो तिप्पट होणार असल्याने याचा परिणामही होणार आहे.