आॅनलाईन खरेदीबद्दल वाढताहेत सांगलीकरांच्या तक्रारी
By admin | Published: March 14, 2016 11:06 PM2016-03-14T23:06:56+5:302016-03-15T00:24:52+5:30
ग्राहकांची जागरुकता वाढतेय : जिल्ह्यात तक्रारींच्या निवारणाचे प्रमाण समाधानकारक; ग्राहक संरक्षण समितीही सतर्क--जागतिक ग्राहक दिन
शरद जाधव -- सांगली ‘ग्राहक देवो भवं...’ ही आपल्या संस्कृतीने ग्राहकाला दिलेली एक सार्थ अशी उपमा... अर्थकारणातील आणि देशाच्या प्रगतीतील सर्वाधिक महत्त्वाचा, पण तितकाच दुर्लक्षित घटक म्हणजे ग्राहक. उत्पादकांची मनमानी आणि त्याचा ग्राहकांना त्रास भोगावा लागतो. मात्र, ग्राहकांतील जागरुकता वाढत चालल्याने, होणारी फसवणूक टळत असल्याचे आनंददायी चित्र आहे. तक्रारींच्या आकडेवारीत सध्या आॅनलाईन खरेदीबद्दलच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसत आहे.
जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने सांगली शहरातील ग्राहक चळवळ आणि त्यासाठी प्रशासनाकडून होत असलेले प्रयत्न यावर प्रकाशझोत टाकला असता, सांगलीतील ग्राहक झालेला अन्याय सहन न करता, त्याविरोधात दाद मागण्यात आघाडीवर असल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले.
सांगलीतील ग्राहकांच्या जागरुकतेवर प्रकाश टाकला, तर त्यातून त्या ग्राहकाबरोबरच इतर ग्राहकांचाही फायदा झाल्याचे दिसून येते. सध्याचा जमाना हा आॅनलाईन खरेदीचा जमाना म्हणून ओळखला जातो. मात्र, या प्रक्रियेत फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे ग्राहक चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांनी सांगितले. यातही आॅनलाईन मोबाईल खरेदीतील फसवणुकीच्या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. आॅनलाईन पध्दतीने मागितलेल्या इतर वस्तूंच्या दर्जाबाबतही तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण समितीसुध्दा ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी प्रयत्नशील असते. या समितीकडे गेल्या वर्षभरात १२१ ग्राहकांनी दाद मागितली आहे, तर यावर्षी आतापर्यंत १८ जणांच्या तक्रारी दाखल आहेत.
दर्जेदार वस्तूंबरोबरच वाजवी दर मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे. ग्राहकांची कोणत्याही कारणाने अडवणूक झाल्यास त्यांनी तातडीने तक्रार दाखल केली पाहिजे. उत्पादकांनी त्याची लूट न करता त्याचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे. फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग राहिले पाहिजे.
-डॉ. ज्ञानचंद्र पाटील, ग्राहक पंचायत, सांगली.
ग्राहकांच्या तक्रारींचे स्वरूप...
जिल्हा ग्राहक संरक्षण समितीकडे प्रामुख्याने किराणा दुकानात छापील किं मत नसलेल्या वस्तू विकल्या जातात, ग्राहकांना सौजन्यपूर्ण वागणूक मिळत नाही, विद्यालयातील फी ची पावती दिली जात नाही, फीबाबत शाळेबाहेर फलक लावला जात नाही, शहरातील वाहतूक व्यवस्था, रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत, चुकीच्या पध्दतीने पाणीपट्टीची वसुली, विद्यार्थ्यांना पास मिळत नाहीत, गॅस वितरक गॅस कनेक्शनसोबत इतर साहित्य घेण्यास भाग पाडतात, अशा तक्रारी दाखल केल्या गेल्या आहेत.