सांगलीकरांचा नाद लय भारी, फॅन्सी नंबरसाठी देतात पाच लाख?????
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:43 AM2020-12-15T04:43:23+5:302020-12-15T04:43:23+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘नाद करावा, पण सांगलीकरांचा कुठं’ असे म्हणण्याची वेळ फॅन्सी नंबरसाठी मिळत असलेल्या पसंतीवरून आली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ‘नाद करावा, पण सांगलीकरांचा कुठं’ असे म्हणण्याची वेळ फॅन्सी नंबरसाठी मिळत असलेल्या पसंतीवरून आली आहे. आपल्या दुचाकी अथवा चारचाकीसाठी मनपसंद आणि त्यातही दणकेबाज क्रमांक असावा, यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला वाहनधारक तयार होत आहेत. सांगलीकरांना जेम्स बॉण्ड स्टाईल ००७, ९९९९, ७७७७ या क्रमांकाची भूरळ असून, चारचाकीसाठी पाच पाच लाख रुपये मोजून क्रमांक घेतले जात आहेत.
लाखो रुपयांचे वाहन घेतल्यानंतर त्यास त्याच तोडीचा क्रमांक असावा, यासाठी सांगलीकरांचे प्राधान्य दिसून येत आहे. वाहनधारकांकडून सर्वाधिक पसंती मिळते ती नऊ बेरीज येणाऱ्या क्रमांकांना. त्यातही ९९९९ या क्रमांकास सर्वाधिक ‘रेट’ आहे. त्यानंतर ७ बेरीज येणाऱ्या क्रमांकासही पसंती असते. केवळ १ क्रमांक घेण्यासाठीही मोठी उत्सुकता दिसून येते. त्यामुळे सिरीज खुली झाल्यानंतर सर्वाधिक पसंती १ क्रमांकास मिळते.
यंदा कोरोनामुळे काहीसे अडचणीचे वातावरण असले तरी, वाहनधारकांच्या उत्साहात तसूभरही फरक पडला नाही. त्यामुळेच केवळ गेल्या दहा दिवसांत पसंती
क्रमांकासाठी ४८ लाख २१ हजार रुपये शासनदरबारी जमा झाले आहेत. ‘फॅन्सी नंबर’मधून यामुळेच वर्षाला कोटींचा महसूल मिळत असला, तरी वाहनधारकांचे नंबरवरील प्रेम अधोरेखित होत आहे.
शासनाकडून लवकरच फॅन्सी क्रमांकासाठीचे शुल्क वाढविण्यात येणार आहे. तरीही वाहनधारकांचा उत्साह कायम असणार, हे मात्र नक्की