सांगलीकरांनी पाणी बिलाचे ५८ कोटी रुपये थकविले, महापालिकेसमोर वसुलीचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 04:24 PM2023-02-01T16:24:43+5:302023-02-01T16:26:46+5:30
गेल्या वर्षभरात महापालिकेने नागरिकांना पाणी बिल दिलेले नाही. त्यामुळे एकावरही कारवाई झालेली नाही
शीतल पाटील
सांगली : महापालिकेकडून तीन शहरातील ८८ हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो; पण यापैकी केवळ ३३ हजार नागरिकच पाणी बिल वेळेवर भरतात. यंदा ५५ हजार नागरिकांनी तब्बल ५८ कोटी रुपयांचे बिल थकविले आहे. त्याचा ताण महापालिकेच्या तिजोरीवर पडत आहेत.
कोरोनामुळे महापालिकेने दोन वर्षे पाणी बिले दिली नाहीत. त्यामुळे थकबाकीचा बोजा वाढला आहे. त्यात गतवर्षीची बिलेही अद्याप नागरिकांना मिळालेली नाहीत. परिणामी पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर वाढत चालला आहे. त्यात पाणी बिलातील घोटाळाही समोर आला होता. त्यामुळे पाणीपुरवठा विभागालाच शुद्धतेची गरज भासू लागली आहे. आयुक्त सुनील पवार, नितीन शिंदे यांच्याकडून थकबाकी वसुलीची अपेक्षा आहे.
शहरात नळ कनेक्शन किती?
सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात महापालिकेकडून ८८ हजार ६४१ जणांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.
वर्षाची पाणीपट्टी किती?
महापालिकेची एकूण पाणीपट्टी ६२ कोटी १९ लाख इतकी आहे. यात सांगलीची ४३ कोटी तर मिरज-कुपवाडची १८ कोटी आहे.
वर्षभरात ३३ हजार जणांनी ८ कोटी भरले
गेल्या वर्षभरात तीनही शहरातील नळ कनेक्शनधारकांकडून ७ कोटी ६२ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली आहे.
५५ हजार जणांनी ५८ कोटी थकविले
शहरातील ६६ हजार जणांनी अद्याप पाणी बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे ५८ कोटी ६८ लाख १२ हजार २७४ रुपयांची थकबाकी आहे.
वर्षभरात एकावरही कारवाई नाही
गेल्या वर्षभरात महापालिकेने नागरिकांना पाणी बिल दिलेले नाही. त्यामुळे एकावरही कारवाई झालेली नाही. गतवर्षीची बिले जुलै महिन्यात दिली होती.
थकबाकीदारांवर काय कारवाई करणार?
महापालिकेकडून थकबाकीदारांना पाणी बिल वसुलीसाठी नोटिसा बजाविल्या जातात. त्यानंतर नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई होते.
काय कारवाई करणार?
नागरिकांना लवकरच पाणी बिलाचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तशी तयारी महापालिकेकडून सुरू आहे.
थकीतांवर नजर
पाणीपट्टीच्या बिलांचे वाटप झाल्यानंतर थकबाकी वसुलीसाठी पथके नियुक्त करू. यंदा थकबाकी कमी करण्याचा प्रयत्न आहे. - नितीन शिंदे, कर निर्धारक