बिबट्यांनी केली पळता भुई, आता वाघोबांचीही सरबराई
By संतोष भिसे | Published: October 23, 2023 05:58 PM2023-10-23T17:58:32+5:302023-10-23T17:59:06+5:30
सांगलीकरांनो राजवाडा चौकात वाघ पाहण्याची तयारी ठेवा
संतोष भिसे
सांगली : आजवर गवे, बिबटे आणि अन्य छोट्या-मोठ्या वन्य प्राण्यांच्या शिरकावाला सरावलेल्या सांगलीकरांना आता चक्क वाघांची सवय करून घ्यावी लागणार आहे. ताडोबा अभयारण्यातील आठ वाघांना सह्याद्रीत सोडण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी मिळाल्याने वाघांचे आगमन निश्चित झाले आहे. त्यामुळे सांगलीत राजवाडा चौकात आता बिबट्यापाठोपाठ भविष्यात वाघही पाहण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.
सामान्यत: गवताळ कुरणांत वावरणाऱ्या वाघांसाठी सह्याद्रीचे खोरे अनुकूल नाही. डोंगरदऱ्या आणि कडेकपारीमध्ये तो टिकण्याची शक्यता नाही. चांदोली, कोयना, तिलारी हा जंगल परिसर कुरणांचा नसून डोंगरकपारीचा आहे. वन विभागाच्या प्राणी गणनेत या परिसरात सात वाघ आढळले आहेत, पण ते स्थायिक नाहीत. गोव्यापासून राधानगरीपर्यंत भटकंती करणारे आहेत. त्यात आता नव्याने आठ वाघांची भर पडणार आहे. स्वत:चा भ्रमण परिसर निश्चित करण्यासाठी या वाघांमध्ये संघर्ष पेटू शकतो. त्यातून सह्याद्रीच्या खोऱ्याबाहेर रहिवासी परिसरात येण्याची भीती आहे.
सध्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक गावांत बिबट्यांचा वावर आढळतो. सांगली जिल्ह्यात तर सरासरी आठवड्याला एक-दोन गावांत बिबट्या आल्याच्या बातम्या येतात. आता या गावांमध्ये वाघ आल्याच्या घटनाही घडल्यास नवल नसावे.
राजवाडा चौकात वाघ पाहण्याची तयारी ठेवा
सांगली शहराला गवे नवे नाहीत. राजवाडा चौकात काही महिन्यांपूर्वी चक्क बिबट्याही अवतरला होता. सांगलीकरांसाठी ती भीतीदायक अपूर्वाई होती. भविष्यात या चौकात वाघानेही फेरफटका मारल्यास नवल नसावे. सांगलीकरांना वाघ पाहण्यासाठी जंगलात जाण्याची गरज नसेल, वाघच माणसे पाहायला शहरात येऊ शकेल.
काही प्रश्न, काही शंका
- वाघाला हवीत गवताळ कुरणे गरज, ती कोठे मिळणार?
- सह्याद्रीतील वाघ स्थलांतर करणारे, ते शहरात येणार नाहीत याची हमी काय?
- तृणभक्षी हरीण, सांबर आदी प्राणी म्हणजे वाघांचे अन्न, ते पुरेसे उपलब्ध आहे का?
- उपलब्ध हरणांचा फडशा पाडल्यावर शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांकडे मोर्चा वळणार?
विदर्भातील वाघ सह्याद्रीच्या खोऱ्यात सोडणे व्यवहार्य नाही. चांदोलीचे जंगल लांबीला जास्त व रुंदीला कमी आहे. त्यामुळे नव्या वाघांमध्ये आपली हद्द निश्चितीसाठी संघर्ष पेटू शकतो. त्यातून ते जंगलाबाहेर लगतच्या गावांत येण्याचा धोका आहे. पुरेशा खाद्याअभावी उपासमारही होऊ शकते. सध्या सह्याद्रीच्या खोऱ्यात सात वाघ असल्याचे वन विभाग सांगत असला, तरी सध्या त्यातील किती जिवंत किंवा सक्रिय आहेत हेदेखील पाहावे लागेल. - अजित (पापा) पाटील, मानद वन्य जीवरक्षक, सांगली